भारतीय ओपनरनं MS धोनीवर केला हल्ला, म्हणाले- ‘त्यांनी ना काही जिंकले, ना फलंदाजीद्वारे काही केले’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) ने 15 ऑगस्ट 2019 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. नुकतेच त्यांना आयसीसीने आपल्या दशकातील आयसीसी टी-20 टीम (ICC T20 Team Of Decades) चे कर्णधार म्हणून निवडले आहे. केवळ टी-20 च नव्हे तर त्यांना दशकातील एकदिवसीय संघाचे कर्णधारही बनविण्यात आले आहे. महेंद्र सिंह धोनी यांना जगातील सर्वात महान कर्णधारांमध्ये गणले जाते, पण आता भारतीय संघाचे माजी सलामीवीर आकाश चोप्रा (Aakash Chopra) यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी असे देखील म्हटले आहे की धोनीने टी -20 क्रिकेटमध्ये काहीही केलेले नाही. अशा परिस्थितीत टी-20 संघात त्यांना स्थान मिळणे आश्चर्यचकित करणारे आहे.

धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2011 मधील एकदिवसीय विश्वचषक जिंकला आणि 2013 चा चँपियन्स करंडकही जिंकला. याआधी त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2007 मध्ये पहिला टी-20 विश्वचषकही जिंकला होता. असे असूनही आकाश चोप्रा यांनी म्हटले आहे की, आयसीसीच्या दशकातील टी-20 संघात धोनीचे नाव पाहून त्यांना आश्चर्य वाटले. तसेच या टीममधून जोस बटलरचे नाव बाहेर असल्याचे पाहून चोप्रा यांनी नाराजी व्यक्त केली.

धोनीच्या नावे 98 टी-20 सामन्यांत केवळ 2 अर्धशतके
आकाश चोप्रा म्हणाले की, जर तुम्ही टी-20 बद्दल बघितले तर ना भारताने काही जिंकले आहे आणि ना धोनीने या फॉर्मेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आपण एक टी-20 संघ बनवत आहोत आणि त्यात जोस बटलरसारखा खेळाडू नाही. महेंद्र सिंह धोनीने भारतीय संघासाठी 98 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी 1617 धावा केल्या आहेत. या फॉर्मेटमध्ये त्यांच्या नावावर दोन अर्धशतके आहेत तर त्यांचा स्ट्राइक रेट 126.13 आहे. आयसीसी दशकातील टी-20 संघात भारताचे 4, ऑस्ट्रेलियाचे 2, वेस्ट इंडीजचे 2 आणि श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानचा एक खेळाडू आहे. धोनी शिवाय विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मा यांनाही टी-20 संघात स्थान मिळालं आहे.

दशकातील आयसीसी टी-20 संघ – रोहित शर्मा, ख्रिस गेल, अ‍ॅरॉन फिंच, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, एमएस धोनी, किरोन पोलार्ड, राशिद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा.