पंतप्रधान केपी शर्मांनी केलेलं भगवान राम यांच्याबद्दलचं वक्तव्य सिध्द करण्यासाठी नेपाळनं घेतला ‘हा’ निर्णय

काठमांडू : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भारताविरोधी भूमिका घेणारे नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना खुर्ची जाण्याची भीती असताना आता ते भारतावर निशाणा साधत आहेत. भारताने सांस्कृतिक अतिक्रमण करून बनावट आयोध्या निर्माण केली. खरीखुरी आयोध्या नेपाळमध्ये आहे. प्रभू राम भारतीय नसून ते नेपाळी होते, असा दावा त्यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.

मात्र आता या वक्तव्यानंतर नेपाळच्या पुरातत्व विभागाने पंतप्रधानांचा दावा खरा असल्याचे सिद्ध करण्यासाठी खटाटोप सुरु केला आहे. यासंदर्भातील वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. नेपाळच्या पुरातत्व विभागाने लवकरच श्री रामाच्या नेपाळमधील जन्मस्थानासंदर्भातील अभ्यास व संशोधनाचे काम हाती घेणार असल्याची घोषणा केली आहे. एक जबाबदार संस्था म्हणून नेपाळचे पुरातत्व विभाग काम करतो. मागील अनेक वर्षापासून हा विभाग देशातील सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळांसदर्भातील माहिती मिळवण्यासाठी उत्खनन, संशोधन आणि अभ्यास करत आला आहे, असे नेपाळच्या पुरातत्व विभागाचे महासंचालक दामोदर गौतम यांनी सांगितले. आता पंतप्रधानांनीच भगवान रामाच्या जन्मासंदर्भात वक्तव्य केल्यानंतर यासंदर्भात पुरातत्व विभागाला मागे फिरता येणार नसल्याचे गौतम यांनी सांगितले.

पुरातत्व विभाग इतिहास अभ्यासक, संस्कृतीसंदर्भातील तज्ज्ञ, धार्मिक नेता, प्राध्यापक आणि संशोधकांसोबत एक सामुहिक कार्यक्रम आयोजित करणार आहे. या कार्यक्रमामध्ये यासंदर्भातील सर्व तज्ज्ञांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यानंतर उत्खनन कोणत्या ठिकाणी करण्यात यावे यासंदर्भातील निर्णय घेतला जाणार असल्याचे गौतम यांनी सांगितले. दरम्यान या भागामध्ये प्राचीन संस्कृती होती यासंदर्भातील ठोस पुरावे आमच्याकडे आहेत. मात्र या भागामध्येच आयोध्या होती असा दावा करणारे पुरे सध्या तरी आमच्याकडे नाही, अशी कबुली नेपाळच्या पुरातत्व विभागाने दिली आहे.