पत्नीसोबतच्या अनैतिक संबंधातून नेपाळी नागरिकाचा खून करणारा गजाआड

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये झालेल्या खूनाच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. अर्जुन डबलबहादुर नेपाळी (रा.दुरगोली चाैरा बाजार जवळ नेपाळ) असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी रामकिसन भुरहा डगवरा थारु (वय-23 रा.दुरगोली चाैरा बाजार नेपाळ) यास पोलिसांनी अटक केली आहे.

बुधवार (दिनांक-2 मे) रोजी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कात्रज देहूरोड बायपास हायवे शेजारील सिल्व्हर स्टार हाॅटेलच्या मागील नाल्यामध्ये खून करुन कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अर्धवट कुजलेल्या अवस्थेत एका इसमाची बाॅडी मिळुन आली होती. त्याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील मयत इसम नेमका कोण आहे याचा तपास घेत असताना पोलीस नाईक उज्वल मोकाशी यांनी अतिशय शिताफिने तपास करुन मयत ईसम हा नेपाळचा असून तो पुण्यात मार्बलचे काम करण्यासाठी आला असल्याची माहिती मिळवली.

मयत इसम हा पुण्यातील एका बांधकामावर काम करत असून त्याला दारू पिण्याचे व्यसन असल्याचे समोर आले होते. त्या दिवशी तो कोणासोबत दारू पिण्यास बसला याची माहिती काढली असता, तो नेपाळ येथील अर्जून चाैधरी(वय- 19 रा. आंबेगाव मुळ नेपाळ) याच्या सोबत दारू पित बसला होता हे समजले. त्याच्याकडे अधिक चाैकशी केली असता अर्जुन चाैधरी, परशुराम चाैधरी, मयत अर्जुन भुल व रामकिसन थारू हे 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाची सुट्टी असल्यामुळे दारु पिण्यासाठी महेमुद सय्यद यांच्या गॅरेज जवळ आंबेगाव ( बु) पुणे येथे बसले होते. अर्जुन भुल हा नेपाळ मध्ये राहण्यास असताना अारोपीच्या पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधातून त्यांची गावी भांडणे झाली होती. याच गोष्टीचा राग मनात धरुन रामकिसन भुल याने अर्जुन भुल याची डोक्यात लाकडी बांबूने व दगड मारुन हत्या केली व मृतदेह कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली झाकून टाकल्याचे अर्जुन चाैधरी याने सांगितले. याबाबत आरोपी रामकिसन भुल याच्याकडे चौकशी केली असता , त्याने हत्या केल्याची कबुली दिली.

सदरची कामगिरी दक्षिण प्रादेशी विभागाचे अपर पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर, परिमंडळ -2 चे पोलीस उपायुक्त डाॅ. प्रविण मुंडे, सहायक पोलीस आयुक्त डाॅ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) वाघचाैरे, तसेच तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दत्तजीराव मोहिते, कृष्णा निढाळकर, उज्वल मोकाशी, धनंजय वनवे, महेश मंडलीक, शिवदास गायकवाड यांनी केली.