आर्थिक वादातून पुतण्याने केला काकाचा खून

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – खरेदी केलेल्या घराचा ताबा देत नसल्याने आणि घरासाठी दिलेले पैसे परत करत नसल्याच्या कारणावरून पुतण्याने काकाचा खून केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. पुतण्याने काकावर चाकूने सपासप वार करून खून केला. ही घटना देवळाई चौकात घडली असून घटनेनंतर आरोपी पुतण्या फरार झाला आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांची दोन पथके त्याच्या मागावर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शेख सत्तार शेख सांडू असे खून झालेल्या काकाचे नाव आहे. तर पुतण्या शेख अलीम शेख बुढण असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रविवारी रात्री उशीरा दाखल करण्यात आला आहे.

मयत सांडू यांचा देवळाई परिसरात व्यवसाय असून ते ख्वाजानगरमध्ये राहतात. त्यांचे घर पुतण्या बुढण याने खरेदी केले आहे. त्यावेळी इसारपावती करून काही रक्कम त्याने दिली होती. पैसे देऊनही सांडू घरचा ताबा देत नसल्याने त्यांचा वाद होत होता. काल सकाळी अलीम याने सत्तार यांच्याकडे घराचा ताबा देण्यासाठी तगादा लावला. घर द्या नाहीतर पैसे परत द्या अशी मागणी अलीमने केली होती. मात्र सत्तार याने पैसे देण्यास आणि घराचा ताबा देण्यास टाळाटाळ केली. अलीमने संध्याकाळपर्यंत पैसे नाही दिले तर परिणाम वाईट होतील अशी धमकी त्याने सत्तारला दिली.

काल सायंकाळी सत्तार हे देवळाई चौकातील एका हॉटेलमध्ये बसले असताना अलीम त्या ठिकाणी आला. त्यावेळी सत्तार आणि अलीम यांच्यात पुन्हा वाद झाले. संतापलेल्या अलीमने सत्तार यांच्यावर चाकूने सपासप वार केले. त्यामुळे सत्तार जागेवर कोसळले. या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी सत्तार यांना तपासले. मात्र उचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.

पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली होती. फरार अलीमच्या मागावर दोन पथके पाठविण्यात आली असून, पुढील त पसार पोलीस करीत आहेत.