प्रिती झिंटाच्या एक्स बॉयफ्रेंडला ड्रग्ज प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री आणि भारतीय उद्योगपती म्हणून ओळखली जाणाऱ्या प्रिती झिंटाच्या एक्स बॉयफ्रेंडला ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. नेस वाडिया असे त्याचे नाव आहे. जपानी कोर्टोने नेस वाडियाला शिक्षा सुनावली आहे. स्किईंगच्या सुटी दरम्यान ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी दोषी आढल्यानंतर कोर्टाने हा निर्णय दिला आहे. नेस वाडिया हा भारतातल्या सर्वात श्रीमंत अशा एका व्यावसायिक कुटुंबातील व्यक्ती आहे.

नेमके प्रकरण काय ?

उत्तर जपानी बेट होक्काइडो च्या न्यू चिटोजच्या सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी तपासणी दरम्यान नेस वाडिया यांच्याकडून 25 ग्रॅम नशायुक्त पदार्थ जप्त केले होते. स्निफर डॉगचीही या तपासणीसाठी मदत झाली होती. याबाबत जपानी मीडियाने माहिती दिली आहे. जपानमध्ये अंमली पदार्थांविरोधात कडक कायदे आहेत. शिवाय त्याची कडक अंमलबजावणीही केली जाते. मार्चच्या सुरुवातीला उत्तर जपानी बेट होक्काइडो च्या न्यू चिटोज विमानतळावर नेसला अटक करण्यात आली आहे.

कोण आहेत नेस वाडिया ?

नेस वाडिया 47 वर्षांचा असून 283 वर्ष जुन्या वाडिया समूहाचा तो एकमेव वारसदार आहे. भारताचे प्रसिद्ध उद्योगपती नुस्ली वाडियाचा ज्येष्ठ पुत्र आहे. नेस वाडिया किंग्ज इलेव्हन पंजाब या क्रिकेट टीमचा सहमालक आहे. वाडिया समूहात बिस्कीट कंपनी ब्रिटानिया इंडस्ट्रीजपासून विमान कंपनी गो एअर सारख्या अनेक कंपन्यांचा समावेश आहे. नेस वाडिया तब्बल सात अब्ज किंमतीच्या संपत्तीचा मालक आहे. फोर्ब्स ने याबाबत माहिती दिली आहे.

प्रिती झिंटा आणि नेस वाडिया वाद

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्रिती झिंटाने नेस वाडियावर विनयभंगाचा गु्न्हा दाखल केला होता तेव्हा नेस वाडिया प्रकाशझोतात आला होता. 30 मे 2014 रोजी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्या आयपीएल सामन्यावेळी नेस वाडिया याने तिकीट वाटपावरून प्रिती झिंटाला आपल्या कर्मचाऱ्यांसमोर शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने सर्वांसमोर तिच्याशी असभ्य वर्तन केल्याचाही प्रितीने आरोप केला होता.