40 रुपयांच्या बिलावरून ‘कॅफे’ मालकचा खून

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – उस्मानाबादमध्ये खळजनक घटना घडली असून केवळ 40 रुपयांच्या बिलावरून एका ग्राहकाने इंटरनेट कॅफे मालकाचा खून केला आहे. हा प्रकार गुरुवारी रात्री घडला असून आरोपी स्वत: पोलिसांकडे हजर झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हा प्रकार शहरातील एन्जॉय नेट कॅफेमध्ये घडला आहे. दशरथ गेमा पवार (वय-36 रा. घाटगरी, उस्मानाबाद) असे खून झालेल्या कॅफे मालकाचे नाव आहे.

दशरथ पवार हा मागील अनेक वर्षापासून उस्मानाबाद शहरामध्ये एन्जॉय नेट कॅफे चलवत होते. आरोपी विनोद लंगळे याचे इंटरनेटवर काम असल्याने तो पवार यांच्या नेट कॅफेत आला होता. त्याने याठिकाणी इंटरनेटचा वापर करून आपले काम केले. काम झाल्यानंतर पवार यांनी त्याच्याकडे 40 रुपयांचे बिल मागितले. त्यावेळी विनोद याने बिल देण्यास नकार दिला. त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली.

आरोपी विनोद लंगळे यांना पवार यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. पवार यांच्या छातीवर मार लागल्याने दशरथ पवार जागेवरच बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. घटनेनंतर फरार झालेला आरोपी विनोद काही तासांत पोलिसांसमोर हजर झाला. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.