गंभीर आजारानं पीडित मुलांना देता येणार ‘मृत्यू’ ! ‘या’ देशानं दिली परवानगी

पोलिसनामा ऑनलाइन – जगातील अनेक देशात इच्छामरण चांगलं की वाईट यावरून चर्चा होत असते. अशात नेदरलँड सरकारनं गंभीर आजारानं त्रस्त असलेल्या मुलांबाबात मोठा निर्णय घेतला आहे.

नेदरलँडमध्ये गंभीर आजारांशी झुंजत असलेली काही मुलं अशी आहेत ज्यांचे हाल त्यांच्या कुटुंबीयांना पाहणं कठिण झालं आहे. अशी कुटुंबं सरकारकडे या आजारी मुलांना इच्छामरण देण्याची परवानगी मागत होती. नेदरलँड सरकारनं याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार गंभीर आजारांनी पीडित असलेल्या मुलांचा त्रास संपवण्यासाठी त्यांना मृत्यू देण्याची परवागनी डॉक्टरांना देण्यात आली आहे.

कुटुंबीयांच्या परवानगीनं आणि डॉक्टरांच्या मदतीनं 12 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना अशा प्रकारे मृत्यू दिला जाईल. दरम्यान या निर्णयामुळं कुटुंबीयांचा त्रास कमी करता येईल असा दावा करण्यात येत आहे.

या निर्णयाबाबत डच सरकारमध्ये आरोग्यमंत्री असलेल्या डी जाँग यांनी संसदेला एक पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी देशात गंभीर आणि उपचार नसलेल्या आजारानं ग्रस्त असलेल्या एका 12 वर्षाच्या मुलाला त्याच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसार मृत्यू देण्यासाठी कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या आजारामुळं पीडित मुलाच्या आईवडिलांन भावनात्मक, आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या त्रास सहन करावा लागत आहे असं कारण त्यासाठी देण्यात आलं आहे. मात्र यासाठी पीडित मुलाच्या आईवडिलांची परवानगी आवश्यक असेल.

सध्या जगात ट्री बार्क डिसॉर्डर, कशिंग सिंड्रोम, न्युरोफायब्रोमेटोसिससारखे काही आजार आहेत ज्यांच्यावर उपचार सापडलेले नाहीत. तसंच काही आजारांवर उपचार नसले तरी ते एवढे महाग आहेत की, याचा खर्च करणं शक्य नाही.