‘संपूर्ण देश भाजपासोबत’, ‘कलाकार’ प्रविण तरडेंच्या ‘कमेंट’वर नेटीझन्स भडकले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जेएनयुमध्ये विद्यार्थ्यांवर हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. त्यामुळे देभभरात विद्यार्थी संघटनांनी एकत्र येऊन त्याचा निषेध नोंदवत आंदोलन केलं. या आंदोलनामध्ये अनेक सिनेकलाकार सामील झाले आहे. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने देखील विद्यार्थ्यांची भेट घेतली. देशभरात जेएनयूचा मुद्दा गाजत असताना मूळशी पॅटर्नफेम अभिनेता प्रविण तरडेंनी एका फेसबुक पोस्टवर कमेंट करताना, संपुर्ण देश भाजपासोबत आहे, असे म्हटले. त्यामुळे नेटीझन्सने तरडेंना ट्रोल केले आहे.

या पोस्टमुळे प्रविण तरडे पुन्हा एकदा नेटीझन्सच्या निशाण्यावर आले आहे. भाजपाच्या समर्थनाच्या कमेंटवरुन प्रविण तरडेंना नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. तरडे नेहमीच विविध मुद्द्यावर आपले मत व्यक्त करताना भाजपाचे समर्थन करतात. यापूर्वी आरेतील वृक्षतोडीचे समर्थन करत त्यांनी सहकारी कलाकारांवर निशाणा साधला होता. सध्या, जेएनयुत विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे देशपातळीवर संतापाचं वातावरण आहे, त्यात त्यांनी कमेंट करून स्वत:ला टीकेचं धनी करून घेतलंय.

पत्रकार राजू परुळेकर यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहली होती. त्यामध्ये ‘एकतर तुम्ही देशासोबत आहात किंवा भाजपासोबत आहात ठरवा.’ अशी पोस्ट फेसबुकवर लिहली होती. त्यावर प्रविण तरडेंनी कमेंट करुन म्हटले की, ‘संपुर्ण देश भाजपासोबत’. विशेष म्हणजे जवळपास 2 हजार जणांनी तरडेंना कमेंटमधून उत्तर दिले आहे. यामध्ये टीका करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/