‘लोका सांगे ब्रम्हज्ञान… ‘पेक्षा भूजल पातळी वाढवा ; पालिका प्रशासनाला खडे बोल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन-  एकीकडे भूजल पातळी घटत असताना गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळी ड्रेनेज लाईनमधून पावसाचे कोट्यवधी लिटर पाणी नदी – नाल्यांमधून वाया जात आहे,असे असताना पाण्याची बचत आणि रेनवॉटर हार्वेस्टिंगचा डंका पिटणाऱ्या पुणे महापालिकेकडून ‘ लोका सांगे ब्रह्मज्ञान … ‘ याधर्तीचा कारभार सुरु आहे. रस्तेच काय पदपथही सिमेंटचे असल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरणार कसे ? याकडे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी लक्ष वेधून पावसाळी ड्रेनेजलाईनला रेनवॉटर हार्वेस्टिंगची जोड देऊन त्यासाठी स्वतंत्र ‘पिट’ तयार करण्याची सूचना पालिका प्रशासनाला केली आहे.

याबाबत आयुक्त सौरभ राव यांना आबा बागुल यांनी निवेदन दिले आहे, त्यात म्हटले आहे कि, पुणे शहरात भूगर्भातील पाणीसाठ्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे मात्र प्रशासकीय स्तरावर त्याबाबत गंभीरता नाही. एकीकडे आपण पाण्याची काटकसर करा असा उपदेश पुणेकरांना देत आहोत ;पण पावसाचे पाणी मात्र थेट नदी – नाल्यांमध्ये वाहू देत आहोत. मग रेनवॉटर हार्वेस्टिंग योजनेची व्याप्ती कशी वाढणार ? हा प्रश्न आहे. त्यातही सर्व शहरात आपण सिमेंट क्रॉंक्रीटचे रस्ते साकारले आहेत आणि फुटपाथही सिमेंट ब्लॉकचे आहे मग पावसाळयात पावसाचे पाणी जमिनीत मुरणार कसे ? याचाही विचार पालिका प्रशासनाने केलेला नाही. त्यामुळे पाणी जमिनीत मुरून भूगर्भातील पाणीसाठा वाढण्याला बाधा निर्माण झाली आहे आणि पावसाचे पाणी थेट नदी – नाल्यातून वाहून जात आहे.

पावसाळी ड्रेनेज लाईन मधून हे पाणी नदी – नाल्यात जात आहे,असे करोडो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे पावसाळी ड्रेनेजलाईनला रेनवॉटर हार्वेस्टिंग योजनेची खास जोडणी करण्यासाठी दर शंभर मीटरवर ‘पिट’ तयार करावे जेणेकरून पावसाचे पाणी वाया न जाता ते भूगर्भात मुरेल आणि पाणीसाठा वाढेल. तसेच शहरातील पदपथावर असलेले सिमेंट ब्लॉक बदलून छिद्रे असणारी ब्लॉक बसविल्यास त्यातून पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास निश्चित हातभार लागेल. त्यामुळे ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान… ‘ हा कारभार करण्यापेक्षा रेनवॉटर हार्वेस्टिंगचा प्रभावी वापर करण्यासाठी पावसाळी ड्रेनेज लाईनची खास जोडणी शहरात सर्वत्र केल्यास नदी – नाल्यातून वाया जाणारे करोडो लिटर पावसाचे पाणी खऱ्या अर्थांने जमिनीत मुरेल तसेच याच धर्तीवर शहरातील पदपथावरील सिमेंट ब्लॉक बदलून छिद्रे असणारे ब्लॉक बसवावे जेणेकरून पावसाचे पाणी जमिनीत मुरून खऱ्या अर्थाने भूगर्भातील जलसाठा वाढेल ,असा आशावादही आबा बागुल यांनी व्यक्त केला आहे.