अहमदनगर : साकळाई योजनेसाठी आझाद मैदानावर सोमवारपासून धरणे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – श्रीगोंदा व नगर तालुक्यांतील तब्बल ३५ गावांच्या पाण्याबाबत आस्थेचा विषय असलेल्या साकळाई योजनेच्या मंजुरीसाठी मुंबईत आझाद मैदानात सोमवारपासून (दि.२४) धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. श्रीगोंदा तालुक्यात शेतकऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य शासनाने सदर योजनेची अधिसूचना काढली नाही, तर ९ आॅगस्टपासून बेमुदत उपोषणाचे निवेदन धरणे आंदोलनाच्या दिवशी शासनाला देण्यात येणार आहे. प्रत्येक गावातून लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी विक्रम शेळके, धनंजय शिंदे, शिवाजी वाघमारे, शिवा म्हस्के, युवराज पडोळकर, हर्षवर्धन शेळके, जयसिंग खेंडके, दादासाहेब जगताप, महेश शिंदे, गोवर्धन कार्ले, राजेंद्र लोखंडे, कारभारी बोरूडे, शिवाजी शेलार, बापूराव ढवळे, डॉ. बापू नलगे, अक्षय धोंडे, संतोष लाटे, राजेंद्र बोरूडे, यशवंत लोखंडे, दिलीप शेळके, नवनाथ पवार आदींसह शेतकरी उपस्थित होते.

श्रीगोंदा तालुक्यातील १८ गावे आणि नगर तालुक्यातील हिवरे झरे, घोसपुरी, सारोळा कासार, खडकी, बाबुर्डी बेंद, वाळकी, दहिगाव, साकत, वाटेफळ, रुई, गुंडेगाव, वडगाव, तांदळी, देऊळगाव, गुणवडी, राळेगण, अंबीलवाडी आदी १७ गावांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

सन १९९८ पासून साकळाई योजनेचा विषय चर्चेत आला आहे. तेव्हा युती सरकारच्या काळात या योजनेला तात्विक मंजुरी मिळाली. अनेकांनी याच योजनेच्या मुद्यावर विधानसभा निवडणुका लढवल्या. केवळ निवडणुकांपुरताच हा विषय चर्चेत राहिला. योजनेला प्रशासकीय पातळीवर मंजुरी मिळालीच नाही.
काही महिन्यापूर्वी शेतकऱ्यांनी राजकारण विरहीत समिती तयार करून पुन्हा या योजनेबाबत जनजागृती सुरू केली. त्यास सर्वसामान्य लोकांचा पाठिंबा मिळाला.

या योजनेमुळे जवळपास १२० पाझर तलाव आणि १०० कोल्हापुरी बंधारे भरले जातील. त्यामुळे १८ हजार ५०० हेक्टर क्षेत्र बागायती होणार आहे. यासाठी जवळपास ८०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
आरोग्य विषयक वृत्त-
नंबर वाढला तर चष्म्याची लेन्स नियंत्रित करा, बदलण्याची गरज नाही
रोग प्रतिकारशक्ती दुबळी का होते ? जाणून घ्या
हाडे बळकट बनवण्यासाठी ‘हे’ उपाय आवश्य करा
निरोगी हृदयासाठी योग्य व्यायाम आणि आहार महत्वाचा