नर्सनं सांगितलं मुलगा झाला अन् प्रसूत महिलेच्या हातात दिली मुलगी, आता होणार ‘त्या‘ बाळाची डीएनए चाचणी

अहमदाबाद : गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील एका रुग्णालयाचा आणखी एक हलगर्जीपणा समोर आला आहे. एका महिलेची प्रसूती झाली. प्रसूतीनंतर नर्सने त्या महिलेला तुम्हाला मुलगा झाला आहे, असे सांगितले. मात्र, नंतर डॉक्टरने आईच्या हातात मुलगी सोपवली, असा प्रकार घडल्याने रुग्णालयात एकच गोंधळ झाला. आता त्या मुलीची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरातल्या सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला आहे.

प्रसूतीसाठी या महिलेला गुरुवारी हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. यावेळी सिझेरियन करण्यात आले. थोड्यावेळानंतर नर्सने त्या महिलेला तुम्हाला मुलगा झाला आहे, असे सांगितले. मात्र काही वेळाने त्या महिलेच्या अर्थात आईच्या हातात मुलगी दिल्याने अनेकांना याचा धक्का बसला. त्या महिला आणि तिच्या पतीने हॉस्पिटल प्रशासनाकडे याबाबात तक्रार केली मात्र, त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले नाही.

त्यामुळे त्या दोघांनीही आता पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार केली आहे. रुग्णालयात बाळांची अदलाबदल झाली नाही, असे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले आहे. त्या महिलेले कोव्हिड वॉर्डमध्ये भरती करण्यात आले होते. तिथे इतर कुठल्याही महिलेची प्रसूती झाली नाही. त्यामुळे बाळाची अदलाबदल होण्याचा प्रश्नच येत नाही, असे हॉस्पिटलच्या प्रशासनाने म्हटले आहे.

प्रसूत महिलेला मुलगा झाल्याचे सांगणे ही नर्सची चूक होती. ही मानवी चूक होती, असेही हॉस्पिटल प्रशासनाने म्हटले आहे. अखेर त्या मुलीची डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे हॉस्पिटलने म्हटले आहे.

पोलिसांनी आता हॉस्पिटलमधले सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा निर्णयही घेतला आहे. त्याचबरोबर त्या नर्सची देखील चौकशीही करण्यात येणार आहे. मात्र, अहमदाबादमधल्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अशा घटना याअगोदरही घडल्याने त्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.