पोलिसांच्या गणवेशात नव्या टोपीचा समावेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र पोलिसांच्या गणवेशाता आता नवीन टोपीचा समावेश झाला आहे. बंदोबस्तासाठी नेमण्यात आल्यानंतर पोलिसांच्या डोक्यावर आता फटिंग कॅपऐवजी बेसबॉल प्रकारातील टोपी दिसणार आहे. पोलीस ते सहायक पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंतच्या पोलिसांना या टोप्या त्यांच्या गणवेश खर्चातून पुरविण्यात यावी असे आदेश पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांनी दिले आहेत.

राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई ते सहायक पोलीस निरीक्षक या संवर्गातील पोलिसांना गणवेशाचा भाग म्हणून फटींग कॅप वापरली जाते. परंतु बंदोबस्तासाठी असताना बेस बॉल प्रकारातील टोपीची पकड घट्ट आहे. त्यासोबतच ती उन्हापासून संरक्षणही करते. त्यामुळे या नवीन टोपीचा गणवेशात समावेश करण्यात यावा असे या परिपत्रकात म्हटले आहे.

सध्या वापरात असलेली फटींग कॅप ही केवळ अनुष्ठानिक कर्तव्यासाठी (सेरेमोनियल कॅप) म्हणून वापरावी. तर बेस बॉल प्रकारातील टोपी ही दैनंदिन कामकाजासाठी वापरावी. असे म्हटले आहे. सर्व घटक प्रमुखांनी आपल्या मनुष्यबळासाठी संख्येप्रमाणे टोप्या तयार करून घ्याव्यात आणि सर्व पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून घ्याव्यात. नवीन टोपी तयार करताना ही नमुना टोपीसारखीच राहील तसेच त्यामध्ये घटक कार्यालयाच्या स्तरावर कोणतेही फेरबदल करू नयेत. गणवेशासाठीच्या ५ हजार १६७ रुपये रकमेतून खर्च भागविण्यात यावा असे निर्देश परिपत्रकात देण्यात आले आहेत.