शरद पवारांकडून बाळासाहेबांच्या आठवणींना ‘उजाळा’, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सस्थास्थापनेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन महाविकास आघाडीची स्थापना केली. महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड केली. आघाडीचे नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आल्याने राज्यात ठाकरे सरकार स्थापन होणार हे आता निश्चित झाले आहे. यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, अनेकदा आम्ही भाषणात एकमेकांचा समाचार घ्यायचो, अन् रात्री जेवण करायला एकत्र असायचो, बाळासाहेबांनी लहानतल्या लहान कार्यकर्त्याला संधी दिली, सामान्य कुटुंबातील कर्तृत्ववान व्यक्तीला राज्यात आणि देशपातळीवर बसविण्याची किमया बाळासाहेबांनी केली. तीच परंपरा उद्धव ठाकरेंच्या नेतृवाकडून पुढे सुरु राहील. सामान्य कुटुंबातील व्यक्तीची काळजी करणारं सरकार असा विश्वास शरद पवारांनी यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्र विकास आघाडीच्या निमित्ताने राज्यात पवार-ठाकरे घराण्याचा नवा अध्याय सुरु झाला आहे. आदित्य ठाकरे, रोहित पवार, सुप्रिया सुळे ही नवी पिढी एकत्र आली. अजित पवारांच्या बंडामुळे सुरुवातीला महाराष्ट्र विकास आघाडीत संघर्ष पहायला मिळाला. पहिल्यांदाच राजकीय घडामोडीत प्रतिभा पवार यांनी कुटुंब सावरण्यासाठी सहभाग घेतला.

शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या निवडणुकीचा किस्सा सांगितला. सुप्रिया सुळे जेव्हा पहिल्यांदा निवडणुकीला उभ्या होत्या, तेव्हा भाजपने त्यांच्याविरोधात उमेदवार देण्याची तयारी सुरु केली होती. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवार यांना फोन करुन आपली मुलगी निवडणूक लढवत आहे, तिच्याविरुद्ध कोणीही उमेदवार देणार नाही, ती बिनविरोध निवडून येईल असे सांगून ते सुप्रिया सुळेंच्या पाठिशी उभे राहिले. या निमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांचे ऋण शरद पवारांनी फेडल्याची चर्चा राजयकी वर्तुळात सुरु झाली.

Visit : Policenama.com