WHO नं केलं ‘धारावी मॉडेल’चं ‘कौतुक’, मुंबईच्या नव्या आयुक्तामुळे ‘कोरोना’ला रोखण्यात यश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   जागतिक आरोग्य संघटनेने धारावी मॉडेलचे कौतुक केले आहे, या मॉडेलने कोरोनाला रोखण्यात यश मिळविले आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून या धारावीची ओळख आहे. मुंबई पालिका आयुक्त इक्बाल चहल यांना धारावीची इत्यंभूत माहिती झाली आहे. त्यामुळे हे शक्य झाले आहे.

धारावीत सुरुवातीच्या काळात रुग्णसंख्या अधिक प्रमाणात वाढत होती. धारावीतील घरांची रचना, मोठी लोकसंख्या, लहान जागा, चिंचोळ्या गल्ल्या यामुळे येथे कोरोना विषाणूचा प्रसार होण्याचा धोका जास्त होत होता. अशा परिस्थितीत महापालिकेने धारावीसारख्या अवघड भागात कम्युनिटी प्रसार होऊ दिला नाही, हे विशेष. यामध्ये आयुक्त इक्वाल सिंह चहल यांचा मोठा वाटा आहे, असे सांगितले जात आहे.

मुंबई महानगरपालिका आयुक्त पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर (9 मे) तातडीने इक्वाल सिंह चहल यांनी धारावी परिसराला भेट दिली. येथील कोरोना संसर्ग प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांची माहिती जाणून घेऊन त्यांनी आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी PPE Kit परिधान करुन थेट अतिदक्षता कक्षात रुग्‍णांची विचारपूस केली.

इक्बाल सिंग चहल हे 1989 च्या बॅचचे IAS अधिकारी असून ते नियमितपणे मॅराथॉनमध्ये सहभागी होतात. ही शर्यत यशस्वीपणे पूर्ण करतात. एक धडाडीचा तसेच फिट अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. यापूर्वी इक्बाल चहल यांनी म्हाडाचे अध्यक्ष, उत्पादन शुल्क आयुक्त, औरंगाबाद आणि ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. नगरविकास खात्याचे मुख्य सचिव म्हणून त्यांची कामगिरी उत्तम मानली जाते.

मुंबईच्या आयुक्तपदावरून प्रवीणसिंह परदेशी यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय तडकाफडकी घेतला. शहरात कोरोनाचा फैलाव आटोक्या ठेवता न आल्याने हे प्रशासकी बदल केल्याचे सांगितले आहे. परदेशी हे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे अधिकारी समजले जात. त्यांच्याकडे आता नगरविकास विभागाच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी आहे.

प्रवीण परदेशींच्या जागी नगरविकास खात्याचे प्रधान सचिव इक्बाल चहल यांची नियुक्ती केली आहे. इक्बाल चहल यांनी यापूर्वी धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे अधिकारी म्हणून यशस्वीपणे काम पाहिले आहे. त्यामुळे त्यांना आशियातल्या या सर्वात मोठ्या झोपडपट्टीची इत्यंभूत माहिती आहे. या अनुभवाचा वापर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी होऊ शकतो.