नागपूर : नव्या पोलीस आयुक्तांनी पदभार स्विकारला, पहिल्याच दिवशी एकाचा खून

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या आहेत. नागपूरच्या आयुक्तपदी अमितेश कुमार यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारण्यासाठी नागपूरात येण्याच्या काही तासांपूर्वी एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली आहे. धांतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून क्षुल्लक कारणावरून व्यक्तीचा खून करण्यात आला आहे. तर लकडगंज आणि अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे.

विलास रामाजी वरठी (वय-54) हे दांदोलीतील यशवंत स्टेडियमजवळच्या फुटपाथवर राहत होते. नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री 7 वाजता ते फुटपाथवर बसले होते. त्यावेळी आरोपी मुकेश आमि त्याचा भाऊ अमोल दादाजीराव मांडवकर (रा. दिघोरी) आले. आणि ते वरठी यांना चिडवू लागले. आमच्याकडे पाहून का थुंकला अशी विचारणा करुन आरोपींनी वरठी यांच्याशी वाद घातला.

एकमेकांना शिवीगाळ केल्यानंतर आरोपी मुकेश आणि अमोलने लोखंडी रॉडने वरठी यांच्यावर हल्ला केला. डोक्यात जबर फटका बसल्याने गंभीर जखमी झालेल्या वरठी यांचा जागीच मृत्यू झाला. भारत विलास वरठी (वय-18) याने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी मुकेश आणि अमोल मांडवकर या दोघांना गुरुवारी रात्री अटक केली.

दुसऱ्या घटनेत एका अरुण जागोजी जुमळे (वय-48) आणि आरोपी गोपी दयाराम शाहू (वय-32) या दोन ट्रक चालकांमध्ये चेष्टा मस्करीतून वाद होऊन आरोपी शाहूने जुमळे याच्यावर हल्ला करत लोखंडी पाईपने डोक्यात वार केले. ही घटना लकडगंजच्या वर्धमान नगरमध्ये घडली. तर अशाच प्रकारची दुसरी घटना मानेवाडातील बजरंगनर येथे घडली आरोपी भूषण उमाटे याने सुमित डोंगरे याने दुचाकीने रात्री साडेअकराच्या सुमारास कट मारला. यावरून दोघांमध्ये वाद होऊन आरोपीने डोंगरेला काठीने बेदम मारहाण केली.