कोकणात जाणार्‍यांसाठी आता नवी अट, ST महामंडळानं घेतला अजब निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी जाण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. 13 ते 21 ऑगस्ट दरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना शासनाच्या निर्देशानुसार एसटी बसचे आरक्षण उपलब्ध करून देण्यात आले. मात्र, कोकणात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवास करण्यापूर्वी कोविड-19 चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. प्रवाशांची कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला तरच त्यांना प्रवासाची परवानगी देण्यात येईल, अशी अट ठेवण्यात आली आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मुंबई, पालघर, ठाणे या विभागातील प्रमुख बसस्थानकांवरून बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना ई-पास नको, पण कोविड-19 टेस्ट निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट आणा असा आदेश महामंडळाने काढला आहे. त्यामुळे कोविड-19 च्या टेस्टसाठी चाकरमान्यांना अडीच हजार मोजावे लागणार आहेत. एकंदरीत कोकणात जाणाऱ्यांची मुस्कटदाबी केली जात आहे, असा आरोप एसटी महामंडळाच्या या निर्णयानंतर केला जात आहे.

महामंडळाचा काय आहे निर्णय ?

13 ते 21 ऑगस्ट दरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आज रात्रीपासून आगाऊ आरक्षणासाठी बस उपलब्ध असणार आहेत. आरक्षण केल्यानंतर प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांना आरक्षण रद्द करता येणार नाही. तसेच त्यांना स्वतंत्ररित्या प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता असणार नाही.

6 ऑगस्टपासून मुंबई, ठाणे,पालघर येथील प्रमुख बसस्थानकावरून कोकणात जाण्यासाठी बसेस सुरु केल्या आहेत. आतापर्यंत 10 हजार प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे. सॅनिटाईझ केलेल्या बसेस प्रवाशांसाठी उपलब्ध केल्या आहेत. प्रवासादरम्यान प्रवाशांना सामाजिक अंतर ठेवणे व तोंडाला मास्क बांधणे बंधनकारक आहे.

प्रवासादरम्यान केवळ महामंडळाच्या अधिकृत ठिकाणी पिण्याचे पाणी व नैसर्गिक विधीसाठी वाहने थांबवण्याची दक्षता महामंडळाने घेतली असून प्रवाशांनी त्यांच्या भोजनाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वत: करावी.