Coronavirus : चीनमध्ये ‘कोरोना’ पुन्हा परतला ? 39 जणांना बाधा झाल्यानं प्रचंड खळबळ

वुहान : वृत्तसंस्था – चीनच्या वुहान शहरापासून सुरु झालेल्या कोरोनाव्हायरस नावाच्या वादळाने आता जगभर थैमान घातलय, भारतासहित जगातील इतर देशांमध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढच होताना दिसत आहे. भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा ४००० पार गेला आहे. अमेरिका इटली, स्पेन यासारख्या देशात कोरोनामुळे सर्वाधिक बळी जात असल्याच्या बातम्या समोर येत असताना मात्र चीनमध्ये कोरोनाचा कहर संपला असल्याची माहिती होती. मात्र आता चीनमध्ये देखील कोरोनाने पुन्हा आपला रंग दाखवायला सुरुवात केली आहे. रविवारी चीनमध्ये कोरोनाचे ३९ रुग्ण आढळून आले. हे सगळे जण परदेशांमधून चीनला परतल्याचं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलंय.

चीनमधील यंत्रणा अलर्ट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व संबंधित यंत्रणा अलर्टवर असल्याची माहिती चीनमधील अधिकाऱ्यानं दिली. परदेशात गेलेले चिनी नागरिक मायदेशी परतत आहेत. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानं आज दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचे एकूण ३९ रुग्ण आढळले असून यातील ३८ जण परदेशातून आलेले आहेत. तर एक व्यक्ती स्थानिक आहे.

परदेशातून येणाऱ्यांमुळे कोरोनाची बाधा

चीनमधून पुन्हा एकदा कोरोना थैमान घालू शकतो अशी भीती चीनच्या अधिकाऱ्यांना वाटू लागली आहे. जगभरात अडकलेल्या चिनी नागरिकांना मायदेशी आणण्याचं चीननं सुरू केलं आहे. परदेशातून चीनमध्ये परतणाऱ्या अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याचं वैद्यकीय अहवालांमधून समोर आलं आहे. त्यामुळे चीनची चिंता वाढली आहे.

कोरोनामुळे चीनमध्ये ३ हजाराहून अधिक बळी

गेल्या डिसेंबरमध्ये चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. यानंतर तिथे कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. मार्चच्या अखेरपर्यंत चीनमध्ये कोरोनामुळे ३ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. मात्र यानंतर हळूहळू चीनमधील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला. याचवेळी संपूर्ण जगभरात कोरोना अतिशय वेगानं पसरत होता. आत्ताही जगातील कित्येक देशांसमोर कोरोनानं मोठं आव्हान उभं केलंय.

भारतातही कोरोनाचा कहर

देशात आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 100 पार झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सोमवारी (6 एप्रिल) सकाळी 9 वाजताच्या आकडेवारी नुसार , गेल्या १२ तासांत 490 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासह, भारतात एकूण कोरोना प्रकरणांची संख्या 4000 ओलांडली आहे. सध्या भारतात एकूण 4067. रुग्ण आढळले असून त्यापैकी 3666. रुग्णांवर उपचार सुरू आहेत.292 रुग्ण बरे झाले आहेत, तर देशात कोरोनामुळे आतापर्यंत 109 लोकांचा मृत्यू झाला आहे.