विधानसभा निवडणूकीसाठी ‘आप’ हे केजरीवालांच्या ‘त्या’ ४ घोषणांवर अवलंबून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने इकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकापाठोपाठ एक घोषणा करीत असतानाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही निवडणुक तयारीला सुरुवात केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी गेल्या २ महिन्यात चार मोठ्या घोषणा केल्या असून त्याचा निवडणुकीत फायदा घेण्याचा आम आदमी पक्षाची योजना आहे.

केजरीवाल यांना केंद्र सरकार विशेषत: नायब राज्यपाल यांच्याशी लढा देण्यात आपला बहुतांश वेळ खर्ची घालावा लागला. आता निवडणुकीला केवळ चार महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. लोकसभा निवडणुकीत आपने काँग्रेसबरोबर आघाडी केली नाही. त्यामुळे दिल्लीतील सर्व सातही जागांवर आप व काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. अनेक ठिकाणी तर आप आणि काँग्रेस यांच्या एकत्रित मतांपेक्षा भाजप उमेदवारांची मते जास्त होती.

पाच वर्षापूर्वीही लोकसभा निवडणुकीत आप ला असाच मार खावा लागला होता. त्यानंतर सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत आप ने चमत्कार करुन ७० पैकी ६७ जागा जिंकल्या होत्या. तसाच काहीसा चमत्कार त्यांना आता करावा लागणार आहे. त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती खुप वेगळी आहे. त्यामुळेच केजरीवाल यांनी विविध घोषणांचा धडका लावून काँग्रेस आणि भाजपला चकीत करुन सोडू लागले आहेत.

दिल्ली मेट्रोमध्ये महिलांना मोफत प्रवासाची पहिली घोषणा करुन केजरीवाल यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे त्याला विरोध करणेही भाजपला शक्य होऊ शकत नाही. त्यापाठोपाठ त्यांनी बसमध्येही महिला मोफत प्रवास करु शकतील अशी घोषणा केली. मुख्य म्हणजे देशभरातील कोणत्याही राज्यात अशाप्रकारे मोफत प्रवासाची पद्धत नाही.त्याचबरोबर दिल्लीतील अनाधिकृत कॉलनी अधिकृत करण्याची मोठी घोषणा त्यांनी केली. त्याचा लाभ ६० लाख लोकांना होणार आहे. या कॉलनी अधिकृत करण्याची प्रक्रिया त्यांनी सुरु केली असून त्यानंतर त्यांचे रजिस्टेशन करणेही शक्य होणार आहे. त्यामुळे या कॉलनीमध्ये राहणाऱ्यांना त्यांच्या घराचा मालकी हक्क मिळणार आहे. त्यातून १ हजार ७९७ कॉलनी अधिकृत होणार आहेत.

केजरीवाल यांनी मोफत पाणी योजना यशस्वीपणे राबविली आहे. दिल्लीकरांना दरमहा २० हजार लिटर पाणी मोफत देण्यावर दिल्ली हायकोर्टने प्रश्न उपस्थित केला असून त्याची सुनावणी सुरु आहे.

आता त्यांनी २०० युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. लोकानुनयी घोषणा करतानाच त्यांनी त्यातून सर्वाना एका छत्राखाली आणले. मोफत पाणी योजना राबविताना त्यातील गळती रोखून चोरुन पाणी घेणाऱ्यांना रोख लावली आहे. त्यामुळे २० हजार लिटर पाणी मोफत देऊनही दिल्ली जल बोर्डाला पूर्वीपेक्षा अधिक महसुल मिळू लागला आहे. त्याचप्रमाणे चोरुन वीज वापर करणाऱ्यांना रोख लावून ते ही योजना यशस्वी करु शकतील असा लोकांना विश्वास वाटतो आहे. एका पाठोपाठ केलेल्या या चार घोषणांनी केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेची तयारी सुरु करुन भाजपच्या पुढे एक मोठे प्रश्न चिन्ह उभे केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –