AAP आमदार प्रकाश जारवाल यांना साकेत येथून अटक ! डॉक्टरला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप  

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आम आदमी पक्षाच्या देवली विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रकाश जारवाल यांना शनिवारी सायंकाळी दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. देवलीचे आमदार प्रकाश जारवाल यांना दिल्लीच्या साकेत येथून अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर एका डॉक्टरला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचा आरोप आहे. यानंतर हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर दिल्लीतील कोर्टाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. डीसीपी साउथ अतुल कुमार ठाकूर यांनी सांगितले की, आमदारासह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोघांचीही चौकशी केली जात आहे.

कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले

डॉक्टरांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या प्रकरणात, साकेत कोर्टाने आम आदमी पार्टीचे देवलीचे आमदार प्रकाश जारवाल आणि इतर आरोपींविरूद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. दुसरीकडे, आमदाराने अटकपूर्व जामिनासाठी कोर्टाकडे याचिका दाखल केली, त्यावर मंगळवारी सुनावणी होईल.

शुक्रवारी छापा टाकण्यात आला

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसीपी सुधांशु धामा, विजय चंदेल आणि नेब सरायचे एसएचओ नरेश सोलंकी यांच्यासह सुमारे 15 पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी तिगरी येथील आमदारांच्या निवासस्थानी छापा टाकला. गोविंदपुरी, रोहिणी आणि दिल्लीच्या इतर भागातही छापे टाकण्यात आले. यावेळी आमदारांच्या घरात सापडलेले सहाय्यक आणि इतरांची चौकशी केली गेली.

18 एप्रिल रोजी डॉक्टरने केली होती आत्महत्या

डॉ. राजेंद्र सिंह यांनी 18 एप्रिल रोजी नेब सराय पोलीस स्टेशन परिसरातील दुर्गा विहार येथे आत्महत्या केली. त्यांनी एक सुसाइड नोटही सोडली. यामध्ये आपचे आमदार प्रकाश जारवाल यांच्यावर छळाचा आरोप करण्यात आला होता आणि पोलिसांनी आमदार आणि त्यांचा साथीदार कपिल नागर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता.