दिल्ली : CAA विरोधात बॅरिकेडवर चढून आंदोलनकर्ते करतायेत ‘घोषणाबाजी’, पोलिसांकडून मागे फिरण्याचे ‘आवाहन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात जामिया मिल्लिया इस्लामियापासून संसद भवनापर्यंत मोर्चा काढण्यात आला आहे. या दरम्यान सतर्कता म्हणून दिल्ली मेट्रो रेल्वे मंडळाने सुखदेव विहार मेट्रो स्टेशनवर प्रवेश बंद केला आहे. तर विद्यापीठात बसलेल्या विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना मार्चमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. परंतु दिल्ली पोलिसांनी मंडी हाऊसमध्ये आंदोलन करण्यास परवानगी दिलेली नाही.

बॅरिकेडिंगद्वारे पोलीस आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांकडून नागरिकांना मागे हटण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु आंदोनलकर्ते मागे हटण्यास तयार नाहीत.

जंतरमंत्रावर विद्यार्थी नेते उमर खालिदने सांगितले की 11 फेब्रुवारीला दिल्लीतील निवडणूकीच्या निकालानंतर हे स्पष्ट होईल की दिल्ली शाहीन बाग सोबत आहे की भाजप सोबत. त्याने एनपीआरचा देखील विरोध करण्यासाठी महिलांना आवाहन केले आहे. आंदोलनात महिलांची संख्या आधिक असल्याने महिला पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे.

होली फॅमिली हॉस्पिटल परिसरात आंदोलनकर्ते पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेडवर चढून घोषणाबाजी करत आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांशिवाय पॅरामिलिट्री फोर्सचे जवान देखील सुखदेव विहार मेट्रो स्टेशनवर तैनात आहेत.