निर्भया केस : कोण आहेत AP Singh, ज्यांच्या कायदेशीर डावपेचामुळं पुन्हा-पुन्हा टळते दोषींची फाशी

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था : निर्भया प्रकरणातील दोषींचे वकील ए.पी. सिंग हे सध्या खूप चर्चेत आहेत. कारण एपी सिंगच्या कायदेशीर डावपेचामुळे निर्भयाचे चार दोषी (विनय कुमार शर्मा, पवन कुमार गुप्ता, मुकेश सिंग आणि अक्षय कुमार सिंग) अनेक महिन्यांपासून फाशीपासून वाचत आलेले आहेत. जाणून घेऊया ए.पी. सिंग बद्दल.

– एपी सिंग हे मूळचे उत्तरप्रदेश चे रहिवासी असून ते अनेक वर्षांपासून दिल्ली मध्ये वकिली करत आहेत.

– जेव्हा कुणीच निर्भयाच्या दोषींचा खटला लढण्यासाठी पुढे सरसावत नव्हते तेव्हा एपी सिंग ने पुढे येऊन ही केस आपल्या हातात घेतली.

– हा खटला लढवताना ते लोअर कोर्टापासून ते दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात अनेक वेळा गेले आहेत. एवढंच नाही तर त्यांच्यावर या प्रकरणामूळे हजारो रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे.

– एपी सिंह हे लखनऊ विद्यापीठातून कायद्याचे पदवीधर असून त्यांनी डॉक्टरेटची पदवी देखील घेतली आहे.

– एपी सिंग यांनी १९९७ मध्ये सर्वोच्च न्यायालयात वकिली सुरू केली होती.

– आपल्या वकिलांच्या कारकीर्दीत प्रथमच ते २०१२ मध्ये निर्भयाच्या दोषींच्या वतीने साकेत कोर्टात हजर झाले.

– एपी सिंग यांनी सांगितले की त्यांनी त्यांच्या आईच्या सांगण्यावरून हा खटला हातात घेतला. ते म्हणाले की जेव्हा अक्षयला बलात्काराच्या आरोपाखाली पकडले गेले तेव्हा त्याला तीन महिन्यांचे बाळ होते. अशा परिस्थितीत त्याच्यावर दया आल्याने त्यांच्या आईच्या सांगण्यावरून त्यांनी हा खटला लढण्याचा निर्णय घेतला.

– १६ डिसेंबर २०१२ रोजी दक्षिण दिल्लीतील वसंत विहार भागात चालत्या बसमध्ये निर्भयावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

– सामूहिक बलात्काराच्या वेळी सर्व ६ नराधमांनी निर्भयावर शारीरिक अत्याचार केले ज्यामुळे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

– फास्ट ट्रॅक मध्ये खटला चालू झाला आणि त्यानंतर कनिष्ठ न्यायालय, दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने विनय, मुकेश, पवन आणि अक्षय या चार दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे.