निर्भया केस : फाशीपासून वाचण्यासाठी दोषी मुकेश पोहचला हायकोर्टात, म्हणाला – ‘घटनास्थळी नव्हतोच’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया प्रकरणात असलेल्या चार दोषींपैकी एक मुकेश सिंगने आता 20 मार्चला फाशी टाळण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुकेश याने आपल्या वकिलांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून असा दावा केला आहे की, 16 डिसेंबर 2012 रोजी रात्री झालेल्या घटनेत तो उपस्थित नव्हता.

याआधी मंगळवारी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी असलेल्या मुकेशची याचिका फेटाळून लावली होती, ज्यामध्ये त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी अर्ज फेटाळण्याबरोबरच त्यांचे वकील एम.एल. शर्मा यांची हजेरी देखील घेतली होती.

मुकेशने एमएल शर्माच्यामार्फत एक अर्ज दाखल केला होता, त्यात असा दावा दाखल केला की, फिर्याद पक्षानं जाणून बुजून काही कागदोपत्री पुरावे लपवून ठेवून त्याला फसवलं होतं. यावर कोर्टाने सांगितले की, ‘वकिलांनी केवळ न्यायालयासमोर चुकीचे विधानच केलेले नाही, तर त्यांची कर्तव्ये पार पाडण्यात ते फारच अपयशी ठरले आहेत.’

मुकेश याने दावा केला की, 16 डिसेंबर 2012 रोजी तो राष्ट्रीय राजधानीत नव्हता. त्याला राजस्थानमधून अटक करण्यात आले होते. घटनेच्या दुसर्‍या दिवशी, त्याला 17 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीला आणण्यात आले. सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितले की, हा अर्ज फक्त डेथ वारंटवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न आहे.

निर्भया प्रकरणात दोषी ठरलेल्या मुकेशच्या आईने फाशीवर स्थगिती मिळावी यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात (एनएचआरसी) अर्ज दाखल केला होता, तो फेटाळला गेला आहे. हा अर्ज फेटाळतांना असे सांगितले जात होते की, मुकेशने न्यायालयीन पातळीवर आपल्या सर्व उपायांचा वापर केला आहे. त्यामुळे यापुढे यात हस्तक्षेप केला जाऊ शकत नाही.

याचिकेत मुकेशच्या आईने म्हटले होते की, या प्रकरणात नामांकित राम सिंह याचा 11 मार्च 2013 रोजी कोठडीत मृत्यू झाला होता आणि त्याचा मुलगा या प्रकरणातील साक्षीदार आहे. अशा परिस्थितीत फाशी देणे कायद्याने चुकीचे आहे.