Coronavirus : होम आयसोलेशनमध्ये राहणार्‍यांना 24 तासांच्या आत डॉक्टरचा सल्ला आणि ऑक्सिमीटर पुरवल्यानं मिळणार मदत; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था- दिल्ली सरकारने होम आयसोलेशनमध्ये राहणार्‍या कोरोना रूग्णांना 24 तासांच्या आत फोनवर डॉक्टरांचा सल्ला देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच ज्या रूग्णांकडे ऑक्सीमीटर नसेल त्यांना तो उपलब्ध करून दिला जाईल. सरकारच्या या पावलाने रूग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या राजधानीत हजारोच्या संख्येने लोक होम आयसोलेशनमध्ये राहून उपचार घेत आहेत. अधिकारी या रूग्णांची चांगली देखभाल होत असल्याचा दावा करत आहेत, परंतु प्रत्यक्षात काही वेगळेच चित्र असल्याचा आरोप विरोधकांनी केले आहे. वेळेवर डॉक्टरचा सल्ला न मिळाल्याने अनेक लोकांची तब्येत जास्त बिघडत असल्याचे म्हटले आहे.

मागच्या वर्षी रूग्णांना फोनवर अशाप्रकारची सुविधा मिळत होती, परंतु यावेळी तिचा अभाव आहे. रूग्णांचा डॉक्टरांशी संवाद होत नाही आणि त्यांना कोणताही आवश्यक सल्ला मिळत नाही. काही लोक आपल्या स्तरावर डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळेवर उपचार घेतात, परंतु बहुतांश प्रकरणात रुग्णांच्या उपचारात उशीर होतो. तसेच अनेक रूग्णांकडे ऑक्सीमीटर नाहीत. सध्या बाजारात ऑक्सीमीटर मिळत नाहीत. याच्या अभावामुळे शरीरातील ऑक्सीजनच्या स्तराची माहिती मिळू शकत नाही.

ऑक्सिजनचा स्तर घसरल्यास रुग्णाची तब्येत जास्त बिघडते. ही समस्या दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिकार्‍यांना होम आयसोलेशन प्रणाली मजबूत करण्याचे निर्देश जारी केले आहेत. याशिवाय तपासणी अहवालाची सुद्धा पूर्ण माहिती ठेवली जाईल, ज्यावरून समजेल की, किती लोकांवर उपचार हॉस्पिटलमध्ये आणि किती लोकांवर होम आयसोलेशनमध्ये सुरू आहे.

पूर्ण माहिती असल्यास रूग्णांवरील उपचार आणि आवश्यकतेनुसार संसाधनाची व्यवस्था करणे सोपे जाईल. अशा प्रकारची व्यवस्था होणे अपेक्षीत आहे. घरात राहणार्‍या रूग्णांना वेळेवर चांगला उपचार देऊन आपण हॉस्पिटलवरील भार कमी करू शकतो. अशाप्रकारे ऑक्सीजन आणि औषधाचा काळाबाजार रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे.