ISRO बनवणार मुलांना युवा वैज्ञानिक, ‘या’ महिन्यात सुरू होणार खास कार्यक्रम, ‘या’ पध्दतीनं करा अर्ज, जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) 2019 पासून शालेय मुलांसाठी युवा विज्ञान कार्यक्रम (युविका) साठी एक विशेष कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाचे दुसरे सत्र मे 2020 मध्ये आयोजित केले जाईल. मुलांना अंतराळ तंत्रज्ञान, अवकाश विज्ञान आणि अवकाश अनुप्रयोगांचे मूलभूत ज्ञान दिले जाणार, जेणेकरून अंतराळ क्रियाकलापांमधील त्यांची आवड निर्माण व्हावी हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

इस्रोने युविका हा कार्यक्रम मुलांना विविध उपक्रम आणि अवकाश विज्ञानाच्या पैलूंविषयी जागरूक करण्यासाठी सुरू केला आहे. आठवी इयत्ता उत्तीर्ण विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतील. निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्यापासून ते प्रवास खर्च इस्त्रोमार्फत करण्यात येणार आहे. 11 मे ते 22 मे या दोन आठवड्याच्या कालावधीत चालणाऱ्या या सत्रात प्रख्यात शास्त्रज्ञ त्यांचे अनुभव मुलांना कळवतील. तसेच मुलांना अंतराळ संशोधन केंद्र व प्रयोगशाळांमध्ये जाण्याची संधी मिळेल. प्रॅक्टिकल आणि फीडबॅक सेशनही घेण्यात येतील. सीबीएसई, आयसीएसई आणि राज्य मंडळाच्या प्रत्येक राज्य / केंद्रशासित प्रदेशातून 3-3 विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. देशभरात ओसीआय उमेदवारांसाठी अतिरिक्त 5 जागा आरक्षित आहेत.

महत्वाचे म्हणजे भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकांसह भारतात शिक्षण घेणारे विद्यार्थीही या कार्यक्रमास पात्र आहेत. 8 वी मधील शैक्षणिक कामगिरी आणि अतिरिक्त-अभ्यासक्रमातील कामगिरीवर आधारित निवड केली जाईल ज्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विशेष विचार केला आहे. निवडीची प्रक्रिया ऑनलाइन नोंदणीद्वारे केली जाणार असून ऑनलाईन नोंदणी 3 फेब्रुवारीपासून इस्रोच्या www.isro.gov.in या संकेतस्थळावर करावी लागेल.

अहमदाबाद, बेंगलोर, शिलांग आणि तिरुअनंतपुरम येथे असलेल्या इस्रोच्या चार केंद्रांवर हा कार्यक्रम आयोजित केला जाईल. निवडलेल्या विद्यार्थ्यांना इस्रो गेस्ट हाऊस / वसतिगृहात निवास मिळेल. विद्यार्थ्यांच्या ट्रेनचा खर्च आणि कोर्समधील साहित्य, राहण्याची व्यवस्था आणि भोजन या कालावधीचा खर्च इस्रो घेणार आहे. पालकांना, विद्यार्थ्यांना अहवाल केंद्रावर पोहोचण्यासाठी आणि पोहोचवण्यासाठी ट्रेनमध्ये द्वितीय श्रेणी एसीने प्रवास करण्याचे भाडे मिळेल.