गरीबांच्या खात्यावर बँकांचा १० हजार कोटींचा दरोडा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उद्योगपती आणि बड्या बड्यांवर मुक्त हस्ते हजारो कोटी रुपयांची कर्ज उधळल्यानंतर अडचणीत आलेल्या बँकांनी ज्यांचा आवाज ऐकायला कोणी नाही अशा गरीब बचत खातेदारांच्या खात्यावर दरोडा टाकण्याचा धंदा सुरुच ठेवला आहे. सर्वसाधारण बचत खात्यामध्ये किमान शिल्लक न राखल्यामुळे देशातील २२ बँकांनी गेल्या ३ वर्षात १० हजार कोटी रुपयांहून अधिक दंड परस्पर वसुल करुन त्यांच्यावर दरोडा टाकला आहे. या २२ बँकांमध्ये विजय मल्ल्या, मेहुल चौक्सी, निरव मोदी यांना कर्ज वाटणाऱ्या पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा यांच्यासह १८ सरकारी तर, आयसीआयसीआय, एचडीएफसी सह चार खासगी बँकांचा समावेश आहे.

मोदींनी बँकांना जनधन खाते सुरु करायला लावून शुन्य बॅलन्सनी कोट्यवधी बँक खाती उघडण्यात आली. या बँक खात्याबाबत अनेक निर्बंध आहेत. या खात्यात वर्षाला ५० हजार रुपयांपेक्षा अधिक व्यवहार करता येत नाही. तसेच एकाचवेळी जादा रक्कम या खात्यात भरता येत नाही की काढता येत नाही. बहुतेक खात्यात एकदा भरलेली रक्कम तशीच खात्यात राहते. मात्र, अनेकांना वेगवेगळी कर्ज व अन्य कामाचे चेक मिळाले तर ते २० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कमेचे धनादेश या खात्यात भरू शकत नाही. असे व्यवहार करायचे असेल तर बँक मॅनेजर त्यांच्याकडून एक फॉर्म भरुन घेतो व त्यांचे जनधन खाते सर्वसाधारण खाते करतो.

अल्पशिक्षित असल्याने शिकलेला बँक अधिकारी बरोबरच सांगत असेल असे वाटून लोक त्यावर सही करतात. त्यामुळे त्यांचे त्यावेळी काम होते़ मात्र, त्यानंतर त्यांचे खाते सर्वसाधारण झाल्याने त्यांना खात्यात किमान १ हजार रुपयांपासून १० हजार रुपयांपर्यंत शिल्लक ठेवावी लागते. पण या खातेदारांकडे तेथील शिल्लक रहात नाही. त्यामुळे शिल्लक न राखल्याने अशा पुर्वीच्या जनधन तसेच गरीब खातेदारांच्या खात्यातून बँका काहीही न कळविता परस्पर दंड वसुली करीत आहेत.

स्टेट बँक महानगर व शहरी भागासाठी दरमहा ३ हजार निमशहरी भागासाठी दरमहा २ हजार आणि ग्रामीण भागासाठी खात्यात किमान १ हजार शिल्लक ठेवावी लागते. नाहीतर स्टेट बँक दरमहा ५ ते १५ रुपये दंड आकारते. खासगी बँकांच्या खात्यात तर दरमहा १० हजार रुपये शिल्लक ठेवण्याची अट आहे. त्यातून या खासगी बँका ४५० रुपयांपर्यंत दंड आकारुन काहीही न करता अफाट नफा कमावत आहे.

गेल्या ३ वर्षात त्यांनी अशा प्रकारे १० हजार कोटी रुपयांहून अधिक दंडवसुल केला. ज्या खातेदाराला बँक खात्यात किमान रक्कम शिल्लक ठेवता येत नाही. त्याच्यापासून काहीही फायदा नसल्याने बँक सर्रास आपल्याला पाहिजे तितका दंड आकारतात.

या गरीबांचा कोणी वाली नसल्याने गेल्या ३ वर्षांपासून त्यांना दंडाच्या रुपाने भुर्दंड बसत असून त्यांच्याकडून गोळा केलेला पैसा बँका उद्योगपती, उद्योजक अशांना न वसुल होणारे कर्ज देऊन उधळत असल्याचे चित्र देशभरात दिसत आहे. मात्र, त्याविषयी कोणीही आवाज उठवित नाही.

आरोग्यविषयक वृत्त –