RSS चा मोदी सरकारला विरोध अन् शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा

नवी दिल्ली : मोदी सरकारसाठी ही बातमी झटका देणारी ठरू शकते, कारण मागील काही दिवसांपासून दिल्लीत सुरू असलेल्या लाखो शेतकर्‍यांच्या तीव्र आंदोलनाला आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संलग्न स्वदेशी जागरण मंचाने सुद्धा पाठिंबा दिला आहे. शेतकरी कायद्यात बदल करता येईल, असे मंचाचे म्हणणे आहे.

नवी कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेले शेतकर्‍यांचे तीव्र आंदोलन आता देशभरात पसरू लागले आहे. दिल्लीत शेतकरी मागे हटण्यास तयार नसल्याने मोदी सरकारची कोंडी झाली आहे. अशावेळी खुद्द संघाशी सलग्न स्वदेशी जागरण मंचाने सुद्धा कृषी कायद्याच्या विरोधात भूमिका व्यक्ती केली आहे. यामुळे मोदी सरकार समोरील अडचणी वाढणार आहेत. कारण, पंजाब – हरियाणा तसेच दिल्ली लगतच्या राज्यांसह देशभरात नवीन कृषी कायद्याविरोधात जनभावना तीव्र होत चालली असताना स्वदेशी जागरण मंचाने ही भूमिका मांडली आहे.

स्वदेशी जागरण मंचाच्या अश्विनी महाजन यांनी म्हटले आहे की, कृषी विधेयकांमध्ये सुधारणा करण्यास वाव आहे. सरकारने शेतकर्‍यांना किमान आधारभूत किंमतीला धक्का बसणार नाही, याचे ठोस आश्वासन दिले पाहिजे. त्यासाठी सरकारने कृषी विधेयकात बदल करावा अथवा नवीन कायदा पारित करावा.