जेएनयु मध्ये उद्भवणार नवा वाद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात लवकरच स्वामी विवेकानंद यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने गेल्या वर्षी त्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यासाठी समिती तयार करण्यात आली होती. हा स्वामीजींचा पुतळा नेमका नेहरु यांच्या पुतळ्यासमोर उभारण्यात येणार असल्याचे त्यावर आता वाद उपस्थित केला जात आहे. नेहरुंचे महत्व कमी करण्यासाठी हा खटाटोप असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

याबाबत विद्यार्थी परिषद आणि शिक्षक संघाने आश्चर्य व्यक्त केले असून एका बाजूला विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी आणि ग्रंथालयासाठी पैसे नाहीत आणि दुसरीकडे पुतळा तयार करण्यासाठी पैसे आणणार कोठून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विद्यापीठ प्रशासनाकडून निधी कमी असल्याचे सांगितले जात आहे. ग्रंथालयाला दिल्या जाणाऱ्या निधीत मोठी कपात केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक चांगली मासिके, संशोधन पेपर उपलब्ध होऊ शकत नाही.  मात्र, ग्रंथालयाच्या निधीत कोणतीही कपात केली नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाचे म्हणणे आहे.

केंद्र सरकारकडून जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा व राजीव गांधी यांच्या नावाने देशभरात सुरु असलेल्या असंख्य संस्थांविषयी आकस आहे. ते या संस्थांची नावे बदलू शकत नाही. त्यामुळे नेहरु, गांधी यांचे महत्व कमी करण्यासाठीच जे एन युमध्ये नेहरुंच्या पुतळ्याशेजारी स्वामी विवेकानंद यांचा पुतळा उभारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.