WHO ची माहिती ! ‘कोरोना’च्या पाठापोठात ‘इबोला’ व्हायरसचा उद्रेक, काँगोमध्ये 5 जणांचा मृत्यु

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा कहर सुरु असतानाच आता आफ्रिकेमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत ६ हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. अशात आफ्रिकेमधील काँगो देशात ‘इबोला’ या घातक विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. इबोलाची लागण झालेले ६ रुग्ण पुढे आले असून त्यापैकी ५ जणांचा मृत्यु झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ही माहिती जाहीर केली आहे. काँगोमधील इबोलाचा हा ११ वा उद्रेक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

काँगोमधील बेनी शहरात एप्रिल महिन्यामध्येच इबोलामुळे दोघांचा मृत्यु झाला होता. त्यानंतर या ठिकाणाहून जवळपास १ हजार किमी दूर असणार्‍या म्बानडाका शहरामध्ये इबोलाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या विषाणूने इतके मोठे अंतर कसे काय कापले, असा प्रश्न काँगोच्या आरोग्य विभागाला पडला आहे. प्रभावित भागामध्ये डॉक्टरांचे विशेष पथक आणि औषधांचा साठा पाठविला असल्याचे आरोग्य मंत्री एटेनी लोंगोडो यांनी सांगितले.

२० महिन्यांच्या इबोला विरोधी मोहिमेनंतर एप्रिल महिन्यातच इबोलामुक्तीची घोषणा करण्यात येणार होती. मात्र त्याच्या तीन दिवस आधीच देशामध्ये इबोलाची नवीन प्रकरणे आढळून आली. १३ एप्रिल रोजी काँगोमध्ये इबोला विषाणूजन्य तापाची १० वी साथ संपल्याचे जाहीर करण्याची जागतिक आरोग्य संघटनेने तयारी केली होती. मात्र १० एप्रिलला २६ वर्षाचा एक तरुण आणि १२ एप्रिलला एका तरुण मुलीचा मृत्यु झाल्याने जागतिक आरोग्य संघटनेचे ही घोषणा करण्याचे स्वप्न भंगले.

इबोला या विषाणूचा पहिला रुग्ण १९७० मध्ये सापडला होता. काँगोतील झैरेत अनेक लोक मृत्युमुखी पडल्यावर तेथे बेल्जियन शास्त्रज्ञांनी शोध घेतला असताना त्यांना तेथे ‘इबोला’ चे अस्तित्व सापडले होते. त्या भागातील नदीवरुन या विषाणूला इबोला हे नाव देण्यात आले होते. हा विषाणुही वटवाघळात सापडतो. ज्या लोकांना याचा संसर्ग होतो, ते तापाने आजारी पडतात.