…म्हणून बीट मार्शल पोलिसांना दिली नवी चारचाकी अन् दुचाकी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाची बाधा झालेल्या (होम आयसोलेशन) लोकांना घरातून बाहेर काढून त्यांना कोविड सेंटर अथवा जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी बीटस्तरावरील पोलीस कर्मचाऱ्यांना चारचाकी अन् दुचाकी गाड्या पुरवण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील लोकांच्या शोधासाठी 110 पथकांची नियुक्ती केली असून यात आरोग्य, पोलीस, महसूल, जिल्हा परिषद व अन्य विभागांचाही सहभाग असल्याची माहिती सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी यांनी दिली. होम आयसोलेशनमधील लोक उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल झाल्यास कोरोनाचा प्रसार नक्कीच थांबेल, असे सातपुते म्हणाल्या. सोमवारी एका दिवसात 2400 लोकांना घरातून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात हलवले आहे.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पोलीस प्रशासनाला कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. तसेच ग्रामीण भागात होम आयसोलेशन पूर्णत: बंद केले आहे. घरीच उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांचा शोध आणि माहिती गोळा करण्याचे काम गस्ती पथकाद्वारे सुरु आहे. एका बीट अंमलदाराकडे 25 ते 30 गावे असतात. बीट अंमलदारास प्रत्येक गावात जाऊन त्यांना घराबाहेर काढण्याचे काम करावे लागत आहे. त्यासाठी बीटस्तरावरील पोलीस कर्मचाऱ्यांना प्रत्येक गावात जाणे महत्त्वाचे असल्याने त्यास वाहनांची आवश्यकता होती, त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी जवळपास 108 वाहने उपलब्ध करून दिली आहेत. दरम्यान जवळपास 4 हजार रुग्ण होम आयसोलेशन अंतर्गत उपचार घेत होते. यापुढे होम आयसोलेशन पूर्णत: बंद केले आहे. प्रत्येक गावात कोविड केअर सेंटर सुरू होत आहे. त्यामुळे गावातीलच कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना उपचार घेता येईल. रुग्णांनी प्राथमिक अवस्थेतच उपचार केंद्रात दाखल व्हावे असे आवाहन ग्रामीण पोलिसांनी केले आहे.