शहर पोलिसांच्या ताफ्यात गस्तीसाठी १०० दुचाकी दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरात गस्त घालणाऱ्या पोलिसांसाठी होंडा कंपनीच्या नवीन १०० दुचाकी पोलीस दलाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात होंडा मोटार सायकल अँड स्कूटर्स प्रा. लि. कडून १०० दुचाकी देण्यात आल्या.

यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, होंडा कंपनीचे उप सरव्यवस्थापक हरभजन सिंग, विवेक तनेजा, प्रधान, अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र सेनगांवकर, प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे आदी उपस्थित होते.

यावेळी वेंकटेशम म्हणाले, या दुचाकी लवकरच शहरात गस्त घालणारे पोलीस, वाहतूक पोलीस तसेच शहरातील वेगवेगळ्या चौकीतील पोलिसांना देण्यात येणार आहेत. तसेच शीघ्र कृती दलाला (क्विक रिस्पॉन्स टीम) देण्यात येतील. स्मार्ट सिटी योजनेतून पोलिसांना आणखी काही दुचाकी मिळणार आहेत. पोलिसांची सेवा ही लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी पुणे पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी संघभावनेतून काम करत आहेत. पुणे पोलीस दलात नवनवीन योजना राबविण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाकडून परिश्रम घेण्यात येत आहेत. त्यासोबतच पोलिसांच्या मुलांसाठी पाळणाघर आणि अतिरिक्त ८४ निवासस्थाने बांधण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार आहे.