दरवाढीच्या संकटासोबत इंधन आयातीचा नवा पेच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

इराण अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम थांबवत नसल्याचे कारण देत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी केलेल्या बहुराष्ट्रीय अणुकरारातून माघार घेतली. तसेच अमेरिकेने इराणविरुद्ध निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे भारताला तेथून आयात होणाऱ्या खनिज तेलात कपात करावी लागणार आहे. इराणशी तेल आणि अन्य व्यापारी संबंध ठेवणाऱ्या देशांवरही अमेरिका निर्बंध लादू शकते. इराणवरील तेलविषयक निर्बंध ४ नोव्हेंबरपासून लागू होत आहेत. या निर्बंधामुळे इंधनदरवाढीचा सामना करणाऱ्या भारतापुढे आता इंधन आयातीबाबत नवा पेच निर्माण झाला आहे.

[amazon_link asins=’B01ELJQSS8,B00B24DKFK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’445bee22-b8a5-11e8-b435-9d07d50b3b6d’]

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती व रुपयाचे अवमूल्यन होत असल्याने भारतातील पेट्रोल व डिझेलचे दर सतत वाढत आहेत. देशभरात यामुळे संतापाचे वातावरण आहे. त्यातच अमेरिकेने आता ताठर भूमिका घेतल्याने नवा इंधनपेच निर्माण झाला आहे. इराणकडून होणारी इंधनाची आयात शून्यावर न आणल्यास संबंधित देशांनी संभाव्य कठोर कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार रहावे, या धमकीचा अमेरिकेने पुनरुच्चार केला. स्वत:च्या जोखमीवर इराणकडून इंधन आयात करा, असेही अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेने दिलेल्या या इशाऱ्याच्या कक्षेमध्ये भारतासह चीन, जपान, द. कोरिया आणि युरोपीय देश येत आहेत.

अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी इराणशी केलेला करार विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच मोडीत काढला आहे. हा करार मोडल्याने अमेरिकेकडून इराणवर दोन टप्प्यांत आर्थिक निर्बंध घालण्यात येणार आहेत. यातील दुसरा टप्पा चार नोव्हेंबरला अंमलात येणार आहे. चार नोव्हेंबरपर्यंत सर्व देशांनी इराणकडून केली जाणारी इंधनआयात शून्यावर आणावी, असे अमेरिकेने यापूर्वीच म्हटले होते. एलियट एन्गेल या ज्येष्ठ लोकप्रतिनिधीने या इशाऱ्याबाबत शंका व्यक्त केली. भारत, चीन, जपान, द. कोरिया आणि युरोपीय देश या इराणच्या मोठ्या आयातदार देशांना अमेरिकेच्या या भूमिकेमुळे फटका बसणार आहे.

अण्णांनी सरकारची विनंती फेटाळली, २ ऑक्टोबरच्या आंदोलनावर ठाम

इराणवर ठरल्याप्रमाणे आर्थिक निर्बंध घालण्यात येणार आहेत. विघातक कारणांसाठी आण्विक कार्यक्रम राबविण्याचे दुष्परिणाम काय असतात हे त्यामुळे त्यांच्या लक्षात येईल. याशिवाय, इराणच्या बाबतीत अमेरिकेला सहकार्य न करणाऱ्या देशांवर कठोर कारवाई करण्याची आपण तयारी केली आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे.

देशाच्या एकूण गरजेपैकी ८० टक्के इंधन भारताला आयात करावे लागते. या आयातदार देशांमध्ये इराणचा तिसरा क्रमांक लागतो. भारताची सर्वाधिक आयात ही इराककडून होते व त्यानंतर सौदी अरेबियाचा क्रमांक लागतो. तिसऱ्या क्रमांकावरील इराणकडून होणारी आयात शून्यावर आणणे भारतास शक्य होईल, असे दिसत नाही. एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत भारताने इराणकडून १.८४ कोटी टन कच्चे तेल आयात केले आहे.