चीनमध्ये आणखी एका व्हायरसचा ‘कहर’, 7 जणांचा मृत्यू तर 60 संक्रमित

नवी दिल्ली : वृत्त संस्था  सध्या जग कोरोना व्हायरसविरूद्ध युद्ध लढत आहे. संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने ग्रासले असून तो वेगाने पसरत चालला आहे. यादरम्यान चीनमध्ये आणखी एक संसर्गजन्य रोग समोर आला आहे, ज्यामुळे 7 लोकांचा मृत्यूसुद्धा झाला आहे.

चीनच्या मीडियाने म्हटले आहे की, चीनमध्ये एका नव्या संसर्गजन्य आजाराने सात लोकांचा बळी घेतला आहे. याशिवाय चीनमध्ये 60 अन्य लोकांना याचा संसर्ग झाला आहे. सोबतच या रोगाच्या माणसाकडून माणसाकडे पसरण्याबाबत इशारा देण्यात आला आहे.

पूर्व चीनच्या जिआंगसु राज्यात यावर्षीच्या पहिल्या सहामाहीत प्रथम 37 लोक एसएफटीएस व्हायरसनच्या संपर्कात आले होते. यानंतर 23 लोक पूर्व चीनच्या अनहुई राज्यात संक्रमित आढळले. व्हायरसने पीडित असलेल्या जिआंगसुची राजधानी नानजिंगच्या एका महिलेत प्रथम ताप, खोकला यासारखी लक्षणे दिसली. डॉक्टरांना तिच्या शरीरात ल्यूकोसाइट, ब्लड प्लेटलेट्सची कमतरता दिसून आली. तर एक महिन्याच्या उपचारानंतर तिला हॉस्पीटलमूधन सुटी देण्यात आली.

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, या व्हायरसमुळे आतापर्यत अनहुई आणि पूर्व चीनच्या झेजियांग राज्यात किमान सात लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु, एसएफटीएस व्हायरस हा नवा व्हायरस नाही. चीनने 2011 मध्ये व्हायरसच्या रोग जनूकांना वेगळे केले आणि त्यास बुन्या व्हायरस श्रेणीचे म्हटले आहे.

माणसांमध्ये व्हायरस पसरण्याची शक्यता
तर वायरोलॉजिस्टचे म्हणणे आहे की, या व्हायरसचा संसर्ग माणसांमध्ये पसरू शकतो. झेजियांग विद्यापीठांतर्गत हॉस्पीटलचे एक डॉक्टर शेंग जिफांग यांनी म्हटले की, व्हायरस माणसाकडून माणसाकडे जाण्याच्या धोक्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. रूग्ण दुसर्‍यांमध्ये व्हायरसचा प्रसार करू शकतो. मात्र, डॉक्टरांनी म्हटले की, जोपर्यंत लोक सतर्क आहेत, अशा व्हायरसच्या संसर्गाला घाबरण्याची गरज नाही.