सरकारी कर्मचार्‍यांना 1 एप्रिलपासून आठवडयातून फक्त 4 दिवस काम अन्…

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – नव्या कामगार कायद्याचा कर्मचा-यांना मोठा फायदा होणार असल्याचे दिसत आहे. कारण या कायद्यातील अनेक गोष्टी कर्मचा-यासाठी सकारात्मक ठरणार आहेत. नव्या कायद्यानुसार येत्या काही दिवसांत कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 3 दिवस सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने 4 नवीन कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत त्याच्याशी संबंधित नियमांना या आठवड्यात अंतिम स्वरूप प्राप्त करून देत आहे. या 4 कायद्याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून होण्याची शक्यता आहे.

सध्या या कामगार कायद्याच्या मसूद्यावर शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरु आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 4 दिवस काम आणि उर्वरित 3 दिवस सुट्टीचा पर्याय मिळणार आहे. नव्या कायद्यानुसार सरकारने 4 दिवसात कामाचे तास वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांना 12 तास काम करावे लागेल. आठवड्यात काम करण्याची मर्यादा 48 तासांची आहे. त्यामुळे 12 तास काम केल्यास 4 दिवस काम करून 3 दिवस सुट्टी घेता येऊ शकते. त्याशिवाय मंत्रालयाकडून असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी एक इंटरनेट पोर्टल तयार केले जात आहे. यावर अंसघटित कामगारांची नोंदणी आणि त्यांच्यासाठी असणाऱ्या सुविधांची माहिती दिली जाणार आहे. या माध्यमातून श्रमिक कर्मचाऱ्यांची नोंदणी केली जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अशा वेब पोर्टलबाबत भाषणात उल्लेख केला होता.

याबाबत कामगार सचिव अपूर्व चंद्र म्हणाले की, कामगार कायद्याच्या नियमांना अंतिम रूप देण्याचे काम सुरु आहे. आठवडाभरात हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. लवकरात लवकर कामगार कायदे लागू केले जातील. यात वेतन कायदा, औद्योगिक निगडीत कायदा, सुरक्षा, आरोग्य कायदा, सामाजिक सुरक्षा कायद्याचा समावेश आहे.