वाघोलीतील न्यू मातोश्री हॉस्पिटल झाले बंद ! एका हॉस्पिटलच्या चौकशीचा अहवाल प्रतिक्षेत

शिक्रापुर : वाघोली(ता:हवेली) लोहगाव रोडवर गावठाणातील वाघमारे वस्ती येथे असणारे न्यू मातोश्री हॉस्पिटल बंद झाले आहे. हॉस्पिटलला परवाना तसेच अनधिकृत जागेवर असल्याने भाजप कायदा आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष ॲड. संजय सावंत यांनी आरोग्य विभागाकडे तक्रार केल्यानंतर आरोग्य विभागाकडून समिती स्थापन करून हॉस्पिटलची तपासणी करण्यात आल्यानंतर हॉस्पिटल बंद करण्यात आले आहे.

भाजपचे ॲड. संजय सावंत पाटील यांनी पुणे जिल्हा आरोग्य अधिकारी व तहसीलदार यांना ३० एप्रिल रोजी वाघोलीतील न्यू मातोश्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे कुठल्याही परवानगी नसताना चुकीच्या पद्धतीने चालू असून कुठलेही परवाने नसताना, कोरोना तसेच इतर रोगांवर इलाज करून मोठ्या प्रमाणात बिल आकारले जात असल्याची तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार संबधीत रुग्णालयाचे परवाने चौकशी करण्यासाठी तपासणी समिती स्थापन केली होती.त्या समिती च्या वतीने शहानिशा करण्यात आली. समितीच्या चौकशीनंतर त्या हॉस्पिटल चालकाला ताकीद दिल्यानंतर संबंधित हॉस्पिटल बंद करण्यात झाले आहे.

पुणे जिल्ह्यात कोरोना रोगाने कळस गाठला असून असे बोगस हॉस्पिटल असू शकतात तरी आरोग्य विभागाने याची दखल घेऊन सर्वच हॉस्पिटलचे ऑडिट करणे गरजेचे आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी वाघोली मधील अजून एका नामाकिंत हॉस्पिटल विरोधातील तक्रारीवरून आरोग्य विभागाने समिती स्थापन करून चौकशी केली होती मात्र या चौकशीचा अहवाल अजूनही प्रतीक्षेत आहे त्यामुळे आता त्या नामांकित हॉस्पिटलवर देखील आरोग्य विभाग काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे आहे.