चिकन टिक्का…टिंडा मसाला…Air India आपल्या कर्मचाऱ्यांना देणार ‘डाएट चार्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय हवाई वाहतूक कंपनी एयर इंडियाने आपल्या क्रू मेम्बर्सच्या फिटनेसकडे विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळे विमान कंपनीने आपल्या एयरहोस्टेस आणि  केबिन क्रू मेंबर्ससाठी जेवणाचे काही नियम बनवले आहेत. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांच्या जेवणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणार आहेत.


या नवीन जेवणामध्ये या कर्मचाऱ्यांना डाएट जेवण दिले जाणार आहे. दररोज नवीन मेन्यू असणार आहे. यामध्ये  ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरसाठी वेगवेगळे पदार्थ असणार आहे. त्यासाठी कंपनीने खास नियोजन केले असून यापुढे पूर्ण डाएट जेवणच मिळणार आहे. यामध्ये उपमा, इडली,सांभर, चीला, ऑमलेट, सूप, कबाब, बॉइल्ड राइस, टिंडा मसाला, चिकन टिक्का, तूरडाळ आणि मसुरीच्या डाळीचा समावेश असणार आहे.

यासाठी दिल्लीवरून मुंबईला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये हा प्रयोग राबवला जाणार असून यामध्ये भारतीय खाद्यपदार्थांचा मोठ्या प्रमाणात समावेश असणार आहे. हे जेवण पचायला हलके असून पौष्टिक देखील असणार आहे. हे जेवण फ्लाईटमध्ये असणाऱ्या सर्व क्रू मेम्बर्ससाठी असणार असून यामध्ये पायलटच्या देखील समावेश आहे. आंतरदेशीय फ्लाईट्समध्ये याची चाचणी झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय फ्लाईटमध्ये देखील हा नियम लागू करण्यात येणार आहे.

याचदरम्यान, सरकारने  एअर इंडियाला खासगी कंपनीच्या हवाली करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे तोट्यात असलेली कंपनी नफ्यात येऊन सरकारला देखील याचा फायदा होईल. यासंदर्भात माहिती देताना केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप पुरी यांनी सांगितले होते कि, सरकार हि कंपनी चालवण्यासाठी इच्छुक नसून  2018-19 या आर्थिक वर्षात कंपनीला  4,600 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.