तरुणाईला ऑनलाईन मटका आणि जुगाराचा विळखा 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – स्मार्ट फोनच्या जगतात समाजच्या सर्वच स्तरात बदल होत आहेत. मग मटका आणि झुगार क्षेत्र तरी स्मार्ट होण्यापासून का मागे राहतील. सतत पडणारी पोलिसांची धाड आणि सामाजिक दबाव या कारणामुळे मटक्यांचे अड्डे चालवणे मुश्किल झाले असतानांच मटका किंग कडून मटक्याची स्मार्ट फोनचा आधार घेतला जातो आहे याच स्मार्ट मटक्याने तरुणाईला अक्षरशः पोखरून काढले आहे.

स्मार्ट फोनच्या जगतात काहीही घडू शकत आणि स्मार्ट फोनच्या माध्यमातून समाजाच्या दैनंदिन उठक बैठकीत हि बदल होऊ शकतो हे अलीकडच्या काळात दिसून येते आहे. स्मार्ट फोनच्या अति वापराने तरुणाईत अनेक आजार बळावले आहेत. ऑनलाईन मटका, जुगार आणि लॉटरी त्यांच्या माध्यमातून अनेकांना श्रीमंत आणि गरीब होताना आपण पहिले आहे. परंतु स्मार्ट फोनच्या माध्यमातून अनेक अ‍ॅप्सचा तसेच ऑनलाईन सपोर्टलचा सुळसुळाट सुटला असल्याचे चित्र बघायला मिळते आहे. स्मार्ट फोनवर अ‍ॅप्स डाउनलोड करून त्याच्यावर मटका जुगार खेळला जातो आणि लाखो रुपयांना चुना लावून लोकांना कंगाल करण्याचा कार्यक्रम रोजरोजपणे राबवला जातो. या अशा अ‍ॅप्सवर पोलीस कारवाहीचा जराही धाक नाही यामुळे अशी अ‍ॅप्स लोकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात यशस्वी होत आहेत.

मागच्या दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे अशा ऑनलाईन लॉटरी सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला आणि त्या ठिकाणी असलेले कॉम्प्युटर आणि साहित्य पोलिसांनी जप्त केले. ग्रामीण भागात तरुण बेरोजगारीने ग्रासलेला असतानाच अशा घरबसल्या पैसा कमावण्याच्या अमिषाला तरुण वर्ग सहजच बळी पडत आहेत. त्यामुळे अशा लोकांच्या धंदयाला लगेच चालना मिळत असल्याचे चित्र पाहण्यास मिळते आहे.

कुरकुंभ परिसरात अनेक अवैध धंदे
कुरकुंभ परिसरात अनेक उद्योग धंद्यांच्या उभारणी मुळे या भागात लोकवस्तीचे प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे. नव्याने वाढलेल्या लोकवस्तीत तरुण मुलांचे रोजगारासाठी येण्याचे प्रमाण अधिक असल्याने तरुणांना मोहित करण्यासाठी या भागात अशा ऑनलाईन मटक्या जुगाराचे ऑनलाईन धंदे भरास आले आहेत. त्या व्यवसायांच्या वाढी मुळे रोजगारासाठी आलेल्या तरुणांचा कष्टाचा पैसा अशा ऑनलाईन जुगार मटक्यात वाया चालला असल्याने या भागात पोलीस कार्यवाहीची आवश्यकता असल्याचे बोलले जाते आहे.