‘मिरा-भाईंदर’, ‘वसई-विरार’ परिसरासाठी होणार स्वतंत्र पोलीस आयुक्तालय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुका जशा जवळ येत आहेत, तसे राज्य शासनाने धडाक्याने निर्णय घेण्याचा सपाटा लावला असून त्यातूनच गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत असलेल्या मिरा भाईंदर, वसई विरारसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. ठाणे ग्रामीण आणि पालघर पोलीस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्राचे विभाजन करुन हे नवे आयुक्तालय तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल ४ हजार ७०८ पदे निर्माण करण्यात येणार आहेत. या निर्णयाबरोबरच आर्थिक तरतुद करण्यात आल्याने हे स्वतंत्र पोलीस आयुक्तालय लवकरच निर्माण होऊ शकणार आहे.

ठाणे ग्रामीण आणि पालघर पोलीस अधीक्षक यांची हद्द खूपच मोठी आहे. त्यात मुंबईतील सर्व नोकरदार हे या भागात मोठ्या प्रमाणावर स्थायिक होत आहे. त्यामुळे येथील वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारी यावर नियंत्रण ठेवून कायदा व सुव्यवस्थेसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची मागणी केली जात होती.
या भागाची २०११ मध्ये लोकसंख्या २० लाख ४६ हजार इतकी होती. ती आता २०१९ मध्ये अंदाजे ४४ लाख ६७ हजार इतकी झाली आहे. त्यामुळे या नवीन आयुक्तालयांतर्गत ४ हजार ७०८ पद निर्माण करण्यात येणार आहे.

त्यासाठी ठाणे ग्रामीण पोलीस दलातील १ हजार ६ आणि पालघर कार्यक्षेत्रातील १ हजार १६५ आणि इतर पोलीस घटकांतून ३१७ अशी एकूण २ हजार ४८८ पदे या नवीन पोलीस आयुक्तालयात वर्ग करण्यात येणार आहेत. तसेच विविध संवर्गातील २ हजार २२० नवी पदांची निर्मिती करण्यात येणार आहे. नवीन पोलीस आयुक्तालयातच्या निर्मितीसाठी आवश्यक पदनिर्मिती, वाहने, पोलीस ठाण्यांची निर्मिती आणि पोलीस आयुक्तालय, मुख्यालय यासाठी १३० कोटी आवर्ती व ४३ कोटी अनावर्ती खर्चासही मंजुरी देण्यात आली आहे.

या नवीन पोलीस आयुक्तालयाचे प्रमुख हे अप्पर पोलीस महासंचालक दर्जाच्या पोलीस आयुक्त असतील. या नवीन पोलीस आयुक्तालयात ठाणे ग्रामीण पोलीस दलातील मिरा रोड, काशिमिरा, नयानगर, नवघर, उत्तर अशी ६ पोलीस ठाणी तसेच पालघर पोलीस दलातील वसई, विरार, नालासोपारा, माणिकपूर, वालीव, अर्नाळा, तुळींज अशी ७ पोलीस ठाणी अशी एकूण १३ पोलीस ठाणी नवीन आयुक्तालयात वर्ग करण्यात येणार आहे. याशिवाय काशीगाव, खारीगाव, पेल्हार, आचोळा, मांडवी, बोळींज, नायगाव अशी ७ नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात येणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –