महाराष्ट्राच्या स्मृती मानधनाचा नवा विक्रम 

वेलिंग्टन : वृत्तसंस्था – महाराष्ट्राच्या स्मृती मानधनाने सातत्यपूर्ण कामगिरी करताना न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या २०-२० सामन्यात विक्रमाला गवसणी घातली. तिने केवळ २४ चेंडूत अर्धशतक झळकावित स्वत:चाच विक्रम मोडून नवा विक्रम केला आहे. तिने २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्ध २५ चेंडूंत अर्धशतक झळकावले होते.

न्यूझीलंडने विजयासाठी ठेवलेल्या १६० धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना प्रिया पुनिया ( ४) लगेच माघारी परतली. मात्र, स्मृती मानधना व जेमिमा रॉड्रिग्ज या महाराष्ट्राच्या कन्यांनी न्युझिलंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. २०१८ सालची आयसीसीची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू ठरलेल्या स्मृतीने या सामन्यात विश्वविक्रमाला गवसणी घातली. तिने अवघ्या २४ चेंडूंत ५० धावा करताना भारतीय महिला क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम नावावर केला आहे.

स्मृतीने अर्धशतकी खेळीत 7 चौकार व 3 खणखणीत षटकार खेचले. तिने 34 चेंडूंत 58 धावा केल्या. स्मृतीने या खेळीसह स्वत:च्याच नावावर असलेला विक्रम मोडला.