उपमुख्यमंत्री सुशील मोदीचा पत्ता का कापला ?, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लान

पाटणा: पोलीसनामा ऑनलाईन – बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपपेक्षा कमी जागा मिळवूनही संयुक्त जनता दलाचे (JDU) सर्वेसर्वा नितीश कुमार यांना पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला. त्यांनी काल मुख्यमंत्रिपदाची शपथ ( Nitish Kumar took oath as the Chief Minister) घेतली आहे. नितीश कुमार यांनी आतापर्यंत सातव्यांदा आणि सलग चौथ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी भाजपच्या सात आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र यामध्ये सुशील कुमार मोदी ( Sushil Kumar Modi) यांचा पत्ता कट करण्यात आला. त्यामुळे नाराज झालेले सुशील मोदी सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेपासून दूर राहिले. मागील सरकारमध्ये मोदी यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद होते. मात्र यंदा पक्षाने त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलेे नाही.

नितीश कुमार यांना शपथविधीनंतर सुशील कुमार मोदींबद्दल प्रश्न विचारण्यात आला. मात्र याबद्दलचे प्रश्न तुम्ही भाजप नेत्यांना विचारा, असे उत्तर त्यांनी दिले. जनमताचा कौल मिळाल्याने राज्यात एनडीएने सरकार स्थापन केले आहे. सुशील मोदींना उपमुख्यमंत्रिपद का दिले नाही, याबद्दलचे प्रश्न तुम्ही त्यांना (भाजपला) विचारा. कारण हा निर्णय त्यांनी घेतला असल्याचे नितीश कुमार म्हणाले. आमची भाजपसोबत युती आहे. आम्ही सोबत काम करतो आणि यापुढेही करत राहू, असेदेखील ते म्हणाले.

बिहार निवडणुकीचे भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनादेखील सुशील मोदींना उपमुख्यमंत्रिपद का नाकारले याबद्दलचे प्रश्न विचारण्यात आले. सुशील मोदी अजिबात नाराज नाहीत. ते पक्षासाठी महत्त्वाचे नेते आहेत. पक्ष नक्कीच त्यांचा विचार करेल. त्यांच्याकडे नवी जबाबदारी दिली ( new-responsibility-will-be-given-sushil-modi-says-bjp-leader-devendra-fadnavis) जाईल, असे फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्रिपद न मिळाल्याने सुशील मोदी नाराज
नितीश कुमार आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा पाटण्यात होते. मात्र त्यांच्या स्वागतासाठी सुशील मोदी गेले नाहीत. मोदींनी त्यांच्या या कृतीतून पक्ष नेतृत्त्वाकडे आपली नाराजी व्यक्त केल्याचे सुत्रांनी सांगितलं. काल दिवसभर सत्ता स्थापनेच्या घडामोडी आणि बैठका सुरू होत्या. त्यातही मोदींचा सहभाग नव्हता.

सुशील मोदींनी जवळपास 13 वर्षे नितीश कुमार यांच्यासोबत काम केले आहे. मागील सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्रीपद भूषवले होते. आताही त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र पक्षाने त्यांना संधी दिली नाही. त्यामुळे मोदी नाराज आहे. कार्यकर्ता हे पद म्हणजे माझ्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाहीत, असे मोदींनी कालच म्हटले होते. त्यावरून ते नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे बिहारमध्ये भाजपने उत्तर प्रदेशच्या पार्श्वभूमीवर दोघांना उपमुख्यमंत्रीपद दिले आहे. तारकिशोर प्रसाद, रेणू देवी यांना उपमुख्यमंत्रीपदी संधी दिली आहे.

नितीश कुमार यांची कसोटी लागणार
नितीश कुमार यांनी याआधी अनेकदा त्यांच्या भूमिका बदलल्या आहेत. कधीकाळी ते पंतप्रधान मोदींचे कडवे टीकाकार होते. मात्र त्यांच्या आमदारांची संख्या भाजपपेक्षा अधिक होती. त्यामुळे सरकारवर त्यांचा वचक होता. आता परिस्थिती बदलली आहे. भाजपच्या आमदारांची संख्या वाढल्याने नितीश कुमार यांच्याकडे सरकारचे नेतृत्त्व असले, तरीही सरकारवर भाजपचे वर्चस्व असेल. अनेक महत्त्वाची खातीदेखील भाजपकडे जाऊ शकतात. त्यामुळे या सरकारचे नेतृत्त्व करणे नितीश कुमार यांच्यासाठी आव्हानात्मक ठरणार आहे.