नववर्षात नवा नियम ! विठ्ठल चरणी आता मोबाइल बंदी

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – पंढरपूरच्या विठोबा मंदिरात मोबाइल बंदी करण्यात आली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नवीन वर्षात आजपासून हा नियम लागू झाला आहे. यासाठी मंदिर समितीने भाविकांचे मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी दर्शन मंडप येथे मोबाइल लॉकरची व्यवस्था केली आहे. लॉकरची सुविधा केल्याने भाविकांनीही समाधान व्यक्त केले आहे.

दरवर्षी हजारो भाविक नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात येतात. आजही येथे भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. मात्र मंदिरात मोबाइल नेण्यास बंदी असल्याने भाविकांनी आपले मोबाइल लॉकरमध्ये ठेवण्यासाठी मोठी रांग लावली होती. येथे येणार्‍या प्रत्येक भाविकाजवळ मोबाइल असल्याने मुख्य मंदिरात सुरक्षेला धोका होऊ शकतो. तसेच मंदिराचे पावित्र राखण्यासाठी मंदिर समितीने बैठकीत मोबाईल बंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 जानेवारी 2020 पासून सुरू झाली आहे, असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

शिर्डीत साईभक्तांची गर्दी
साईंचे दर्शन घेऊन नववर्षांचे स्वागत करण्यासाठी शिर्डीतही काल आणि आज लाखो साईभक्तांनी हजेरी लावली. काल रात्रभर मंदिर उघडे असल्याने रात्री 12 वाजता नवीन वर्ष सुरू होतानाच साईंच दर्शन घेण्यासाठी अनेक भाविकांनी दर्शनबारीत प्रवेश केला होता. यावेळी माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार राजन विचारे यांनीही मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास साईसमाधीच दर्शन घेतले. विखे पाटील आणि भाजप कार्यकर्त्यांनी साई समाधीवर कमळाचे फुल अर्पण केल्यानंतर मोठा हशा पिकला. विखे पाटील यांनी यावेळी जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारला सद्बुद्धी मिळो आणि शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळो, अशी प्रार्थना मी साईचरणी केली आहे.

दरम्यान, नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त साईसमाधी मंदिर, द्वारकामाई, चावडी आणि गुरूस्थान मंदिराला आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते तसेच आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली होती. रात्री 12 वाजताच साईभक्तांनी साईनामाचा गजर करत नव वर्षाचा जल्लोष केला. काही भाविकांनी मिठाई, चॉकलेट वाटून जल्लोष साजरा केला तर काही भाविकांनी केक कापून नवीन वर्षाचे स्वागत केले. अलोट गर्दीमुळे हजारो साईभक्तांनी दूरूनच कळसाचे दर्शन घेतले. समाधी समोरील बाहेरील भागात तसेच द्वाराकामाई परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी संस्थानने आयोजित केलेल्या साई महोत्सवाचाही भाविकांनी लाभ घेतला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/