खासगी क्षेत्रातील नोकरदारांसाठी 1 एप्रिलपासून लागू होऊ शकते नवीन सॅलरी सिस्टीम, जाणून घ्या काय होणार

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  आता नव्या आर्थिक वर्षात बदललेल्या नियमांचा मोठा परिणाम नोकरदार वर्गावर होणार आहे. 1 एप्रिलपासून आता पगारांच्या नियमात महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. जर हे बदल लागू झाले तर तुमच्या खात्यात कमी पगार येऊ शकतो. गेल्यावर्षी संसदेत वेतन नियमावली विधेयक मंजूर झालं आहे. हे विधेयक 1 एप्रिल पासून लागू होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. जर हे विधेयक लागू झालं तर खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या खिशावर याचा थेट परिणाम होणार आहे.

जर हे नवीन वेतन नियमावली विधेयक एप्रिल महिन्यात लागू झालं तर नोकरदारांच्या हातात पगाराच्या रुपानं येणाऱ्या रकमेवर याचा परिणाम होताना दिसणार आहे. कारण सर्व प्रकारची कपात झाल्यानंतर नोकरदारांच्या हातात येणारा पगार कमी होणार आहे.

नव्या बिलानुसार, कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना दिला जाणारा पगार म्हणजेच कॉस्ट टू कंपनी (CTC) च्या 50 टक्के रक्कम बेसिक आणि 50 टक्के भत्ता अशा रूपात द्यावा लागणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या एकूण पगाराची 50 टक्के रक्कम आधीच बेसिक आहे त्यांच्यावर या नव्या नियमांचा काहीही परिणाम होणार नाही. ज्यांची बेसिक सॅलरी एकूण रकमेच्या 30 ते 40 टक्के आहे त्यांच्या येणाऱ्या पगारात मात्र कपात होईल.

नेमकी कशी आहे पगाराची नवी व्यवस्था ?

जर एखाद्याचा पगार (CTC) 10,000 रुपये आहे तर त्याच्या या पगाराची 50 टक्के म्हणजे निम्मी रक्कम ही बेसिक ठेवावी लागेल. यानुसार त्या कर्मचाऱ्याचा बेसिक पगार हा 5000 रुपये होईल आणि याच पगारावर 12 टक्के म्हणजेच 600 रुपये PF म्हणून कापले जातील. या टप्प्यात कर्मचाऱ्यांच्या पगारातील रक्कम कपात होणार असली तरी ती रक्कम कर्मचाऱ्याच्याच मालकीची असणार आहे. विशेष म्हणजे इतकीच रक्कम पुन्हा कंपनीलाही यात टाकावी लागेल. म्हणून कपात जरी होत असली तरी हे नियम कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी फायद्याचे ठरतील हे मात्र नक्की आहे.

तुमच्या हातात किती पगार येणार ?

जर कंपनीनं 5 टक्के ग्रॅच्युटीची रक्कम कापली तर 5000 रुपयांमधून 250 रुपये ग्रॅच्युटी म्हणून कपात होतील. म्हणजेच बेसिक पगारातून नोकरदाराच्या हातात 4150 रुपये शिल्लक राहतील. अशावेळी 10000 रुपये पगार असणाऱ्या नोकरदाराच्या हातात 4150 (बेसिक) + 5000 (इतर भत्ते) = 9150 रुपये एवढी रक्कम येईल.