राज्यात लवकरच येणार नवा सातबारा, होणार तब्बल 11 बदल

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्य सरकारने शेतकर्‍यांसाठी खुषखबर दिली आहे. जमिनिंच्या व्यवहारासाठी सातबारा खूप महत्त्वाचा असून जुन्या पद्धतीने असलेला सातबारा आता नव्या आणि सुटसुटीत स्वरुपात मिळणार आहे. राज्य सरकार लवकरच साधा आणि सोपा असा सातबारा तयार करणार आहे. सध्या सगळे व्यवहार हे संगणकाच्या माध्यमातून होतात. त्यामुळे काळाची गरज लक्षात घेत नवीन सातबारा तयार करण्यात येणार आहे.

आता वापरात असलेला शासकीय भाषेतील सातबारा हा थोडा किचकट आहे. यातल्या नोंदी आणि भाषा हा मोठा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे महसूल विभागाने या ब्रिटिशकालीन साताबार्‍यामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शासनाला प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती राज्य समन्वक आणि उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली आहे. या नवीन साताबार्‍यामध्ये वेगवेगळे असे तब्बल 11 बदल करण्याचे सुचवण्यात आले आहे.

यामध्ये पहिल्यांदाचा महाराष्ट्र शासनाचा लोगो, गावाचा बारकोड असे अतिशय महत्त्वाचे आणि सोपे बदल करण्यात येणार आहेत. सातबारामध्ये गाव नमुना 7 मध्ये गावाच्या नावासोबत एलजीडी कोड दाखवण्यात येणार आहे. सातबारा 7 मध्ये खाते क्रमांक यापूर्वी इतर हक्क करण्यासोबत नमूद केला जात होता. पण आता नवीन सातबारानुसार खातेदार/खातेदारांच्या नावा सोबतच नमूद केला जाईल अशी माहिती देण्यात आली. यामुळे साताबारा भरणे आणि माहिती सुटसुटीत दिसेल. नवीन सातबार्‍यामध्ये लागवडी योग्य क्षेत्र, क्षेत्राचे एकक खातेदार अथवा संपूर्ण क्षेत्र विक्री केलेले खातेदार आणि इतर माहितीत बदल करण्यात येणार आहे.