गलवानमध्ये संघर्ष झालेल्या ठिकाणी चीनने पुन्हा केले बांधकाम

पोलिसनामा ऑनलाईन – लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी, सैन्य मागे घेण्यासाठी भारत आणि चीन दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवर चर्चा सुरु आहे. पण त्याचवेळी चीनने गलवान खोर्‍यातील संघर्ष झालेल्या ठिकाणी पुन्हा बांधकाम केले आहे. सॅटलाइट फोटोवरुन चीनने संघर्ष झालेल्या भागात पुन्हा बांधकाम केल्याचे स्पष्ट दिसत आहे.

मागच्या आठवडयात पेट्रोलिंग पॉईंट 14 जवळ चीनने टेहळणी चौकी उभारल्याने मोठा संघर्ष झाला होता. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले तर चीनने 40 पेक्षा जास्त सैनिक ठार झाले होते. चीन आता चर्चेच्या माध्यमातून वाद सोडवण्यात आपल्याला रस आहे असे दाखवतोय, पण प्रत्यक्षात नियंत्रण रेषेवरील त्यांचा आक्रमक पवित्रा अजूनही कायम आहे. गलवान व्हॅलीतील संघर्षानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यावर जोर दिला. मात्र, त्यानंतर चीननं आता सैन्य देपसांग, दौलत बेग ओल्डी सेक्टरमध्ये हलवले आहे. चीन येथे सैन्य तळ उभारत असून, पुन्हा भारतीय लष्कराच्या गस्तीमध्ये अडथळे आणण्याच्या प्रयत्न करत आहे. गलवान खोर्‍यातील सॅटलाइट फोटोमध्ये दिसणार्‍या चिनी बांधकामाला लष्कराने दुजोराही दिलेला नाही किंवा ते फेटाळलेले सुद्धा नाही. मॅक्सार या स्पेस टेक्नोलॉजी कंपनीने 22 जून रोजी हे फोटो काढले आहेत. पेट्रोलिंग पॉईंट 14 जवळ चीनने बांधकाम केल्याचे यातून स्पष्ट दिसते.