पर्यटनाचे केंद्रस्थान बनलेल्या ‘या’ ठिकाणी पश्चिम रेल्वे बनवणार नवं स्टेशन 

गुजरात : वृत्तसंस्था – नर्मदा नदीतील सरदार सरोरवरामध्ये उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’वरून राजकीय वर्तुळ आणि समाजामध्ये मतमतांतरे निर्माण झाली होती. पण सर्वसामान्य पर्यटकांमध्ये मात्र स्टॅच्यू ऑफ युनिटी आकर्षणाचे केंद्र बनला आहे. येथे उभारण्यात आलेली सरदार पटेल यांची भव्य प्रतिमा पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येथे येत आहेत. केवळ दिवाळीच्या सुट्टीमध्येच सुमारे ७५ हजार पर्यटकांनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला भेट दिली असून, केवळ येथील तिकीट विक्रीमधूनच सुमारे अडीच कोटी रुपयांची कमाई झाली होती.

वाढत्या पर्यटनामुळे या ठिकाणी पर्यटकांना रेल्वेच्या माध्यमातून पोहोचता यावं, यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासन नव्या स्टेशनचं निर्माण करणार आहे. जिथे सरदार वल्लभभाई पटेल यांची भव्य प्रतिमा विराजमान आहे. तिकडे पर्यटकांना पोहोचण्यासाठी पाच किलोमीटर अंतरावर केवडिया या स्टेशनची निर्मिती करण्यात येणार आहे. हे रेल्वे स्टेशन अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज असणार आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी ही माहिती दिली आहे. येत्या १५ डिसेंबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या रेल्वे स्टेशनचं भूमिपूजन करणार आहेत. यादरम्यान रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणीही उपस्थित राहणार आहेत. केवडिया रेल्वे स्टेशन निर्माणासाठी जवळपास २० कोटी रुपयांपर्यंतचा खर्च येणार आहे. या रेल्वे स्टेशनचं काम सप्टेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे. सद्यस्थितीत पश्चिम रेल्वे डभोई आणि चांदोद स्टेशनांदरम्यानच्या १८किलोमीटर लाइनचा विस्तार करत आहे. त्यानंतर त्याची पुढील लाइन ३२ किलोमीटर अंतरावर असलेल्या केवडियापर्यंत वाढवण्यात येणार आहे.

केवडिया स्टेशनची इमारत तीन मजली असणार आहे. पहिल्या दोन मजल्यांवर रेल्वे संबंधित सुविधा पुरवण्यात येणार आहे. तर तिसऱ्या मजल्यावर एक आर्ट गॅलरी बनवण्यात येणार आहे. या गॅलरीमध्ये स्थानिक आदिवासी जाती यांची कला आणि शिल्पकला प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात उंच १८२ मीटर उंचीच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते  ३१ ऑक्टोबर रोजी लोकार्पण झाले होते. मात्र या पुतळ्याची प्रवेश फी ही जगप्रसिद्ध ताहमहलच्या प्रवेश फीपेक्षा सातपट अधिक महाग असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती. तरीही येथे भेट देणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण वाढत आहे. सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडचे मुख्य अभियंता पी.सी. व्यास यांनी सांगितले की, केवळ गुजरातच नाही तर राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामधूनही येथे पर्यटक येत आहेत.