देशात ‘कोरोना’च्या नव्या प्रकाराचा एकही रुग्ण नाही, पण…

पोलीसनामा ऑनलाईनः ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळला आहे. या विषाणूचे संक्रमण झालेले अनेक रुग्ण ब्रिटनमध्ये आढळल्याने येथे पुन्हा एकदा लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे जगातील इतर राष्ट्रांनी ब्रिटनहून येणारे हवाई मार्ग बंद केले असून भारताने देखील बिटनच्या विमानावर बंदी घातली आहे. भारतातही सर्तक राहण्याच्या सूचना दिल्या आहे. देशात अद्याप करोनाचा नवीन प्रकार आढळून आला नाही, मात्र चिंता कमी झाली नसल्याचे एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया (AIIMS Director Randeep Guleria) यांनी सांगितले.

गुलेरिया म्हणाले, देशात नव्या प्रकाराच्या विषाणूचे संक्रमण झालेला रुग्ण आढळला नाही. मात्र, आता आढळून येणाऱ्या रुग्णांच्या चाचण्या करणे गरजेचे आहे. कारण आतापर्यंत आपण हे बघत होतो की, रुग्ण पॉझिटिव्ह आहे की नाही. आता आपल्याला विषाणूच्या जेनेटिक सीक्वेन्सही बघावा लागणार आहे. विशेषतः जे लोक ब्रिटनमधून येत आहेत, त्यांच्यामध्ये नव्या प्रकाराच्या विषाणूच जेनेटिक सीक्वेन्स तर नाही ना. त्याचबरोबर त्यांच्या हा विषाणू आढळून आला, तर त्यांचे विलगीकरण करून, त्यांची देखरेख जास्त करावी लागणार आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यावर भर द्यावा लागणार आहे. ज्यामुळे सामूहिक स्वरूपात याचा प्रसार होऊ नये, अशी खबरदारी घेण्याचे आवाहन गुलेरिया यांनी केले आहे.

लंडन आणि दक्षिण ब्रिटनमध्ये हा विषाणू आढळून आला आहे. जिथे हा विषाणू आढळून आला, तिथे करोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे लवकर पसरत आहे, त्यामुळे जिथे हा विषाणू पोहोचेल तिथे रुग्णसंख्या वेगाने वाढू शकते. त्यामुळे ब्रिटनहून येणारी विमाने रोखली आहेत. तिथून येणाऱ्या व्यक्तींवर विशेष नजर ठेवली जात असल्याचेही गुलेरिया यांनी सांगितले.