पुण्यात रिक्षावाल्यानं इंजिनिअरला 4300 रूपयांना ‘असं’ फसवलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भाडे नाकारणे आणि मनमानी पद्धतीने भाड्याची  मागणी करण्याचे प्रकार शहरात वाढले आहेत. एका  प्रवाशाकडून  रिक्षा चालकाने  फक्त 18 किमीसाठी तब्बल 4 हजार 300 रूपये उकळले आहेत. येरवाडा पोलिस स्टेशनमध्ये रिक्षाचालकाच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून त्याचा शोध घेतला जात आहे.

बंगळुरुवरुन पुण्यात पहिल्यांदाच आलेल्या एका इंजिनिअरला रिक्षा चालकाने चांगलाच गंडा घातला आहे. रिक्षा चालकाने 600 रुपये शहरात प्रवेश करण्याचे आणि 600 रुपये शहरातून बाहेर पडण्याचे व उरलेले भाडे असे सांगत  4300 रुपये उकळले. या सर्व प्रकारानंतर तरुणाने रिक्षा चालकाविरोधात पोलिसात तक्रार देखील दाखल केली.

तक्रारदार तरुण कात्रज-देहू रोड बायपासवर पहाटे 5 वाजता उतरला. त्यावेळी त्याने  ऑनलाइन कॅब बुक करण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी त्याला एकही कॅब मिळाली नाही. त्यामुळे त्याने नाईलाजाने रिक्षा केली. जेव्हा तो येरवड्याला पोहचला त्यावेळी रिक्षाचालकाने त्याच्याकडून तब्बल 4300 रुपये भाडे आकारले. नवीन शहरात असल्याने तरुणाने भीतीपोटी त्याला संपूर्ण पैसे  दिले. मात्र नंतर त्याने पोलिसात जाऊन याप्रकरणी तक्रारही नोंदवली.

visit: Policenama.com