गृहमंत्री देशमुखांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, 15 फेब्रुवारीला नागपूर-मुंबई विमान प्रवासाचे तिकीट पडणार महागात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी हप्ता वसुलीचे टार्गेट दिले होते, असा सनसनाटी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या आरोपामुळे भाजपासह इतरही पक्षाच्या काही खासदारांनी सोमवारी (दि. 22) संसदेत गदारोळ घालत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन परमबीर सिंग यांचा दावा खोडण्याचा प्रयत्न केला. मात्र 15 फेब्रुवारीला  देशमुखांनी  पत्रकार परिषद घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर आता आणखी एक पुरावा समोर आला आहे. देशमुख यांनी 15 फेब्रुवारीला नागपूर ते मुंबई असा विमान प्रवास केल्याचे एका कागदपत्रातून समोर आले आहे. त्यामुळे देशमुखांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

गृहमंत्री  देशमुख यांनी 15 फेब्रुवारी रोजी नागपूर ते मुंबई असा विमान प्रवास केल्याचे समोर आले आहे.  देशमुख यांच्यासह 8 जणांनी हा प्रवास केला असून त्यात पूजा देशमुख यांचाही समावेश आहे. एका खासगी विमानाने ते नागपूरहून मुंबईला आले. विशेष म्हणजे अनिल देशमुख यांनीही मी 15 फेब्रुवारीपासून 27 फेब्रुवारीपर्यंत नागपूर येथील घरीच आयसोलेशनमध्ये होतो, असे व्हिडिओच्या माध्यमातून जाहीरपणे सांगितले आहे. मात्र, नागपूर ते मुंबई या विमान प्रवासाच्या कागदपत्रामुळे पुन्हा एकदा गृहमंत्री देशमुख अडचणीत आले आहेत.

दरम्यान गृहमंत्री  देशमुख फेब्रुवारी महिन्यात 5 ते 15  तारखेपर्यंत कोरोनामुळे रुग्णालयात होते. 15  फेब्रुवारी रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर ते 15 ते 27 फेब्रुवारी दरम्यान नागपुरात राहत्या घरी क्वारंटाईन होते. त्यामुळे परमबीर सिंग यांनी केलेले आरोप आणि वस्तुस्थिती यात खूप फरक आहे. देशमुख फेब्रुवारी महिन्यात कुणाला भेटण्याची शक्यताच नव्हती हे सिद्ध झालंय असे म्हणत शरद पवार यांनी परमबीर सिंग यांच्या आरोपाची हवाच काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर काही वेळातच भाजपा नेत्यांनी ट्विट करुन देशमुख यांनी 15 फेब्रुवारीला पत्रकार परिषद कस काय घेतली, असा प्रश्न विचारला. त्यानंतर आता गृहमंत्र्यांनी 15 फेब्रुवारीला विमान प्रवास केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांचा दावा खोडून काढण्याचा पवार यांचा प्रयत्न असफल ठरला आहे. त्यामुळे आता यावर पवार काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.