जालन्याच्या तिढ्यात नवा ट्विस्ट ; पंकजा मुंडे अर्जुन खोतकरांसह मातोश्रीवर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जालना मतदारसंघाचा तिढा सोडवण्यासाठी आता महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे मध्यस्थी करणार आहेत. शिवसेनेचे राज्यमंत्री तसेच जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह त्या मातोश्रीवर दाखल झाल्या आहेत. दानवे आणि खोतकर यांच्यातील राजकीय वैर हे शिवसेना-भाजप युतीसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे जालना मतदार संघात नक्की कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

शिवसेनेचे राज्यमंत्री तसेच जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर आणि भाजपा प्रदेश अध्यक्ष जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत आहे. दरम्यान आगामी लोकसभा निवडणुका काही दिवसांवरच येऊन ठेपल्या आहेत. शिवसेना-भाजपने युतीची घोषणाही केली आहे. त्यामुळे दानवे आणि खोतकर यांच्यातील वादामुळे लोकसभा निवडणुकीवर काही परिणाम होऊ नये म्हणून, भाजपकडून दानवे आणि खोतकर यांच्यातील वाद मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या दोघांमधील वाद मिटवण्यासाठी पंकजा मुंडे अर्जुन खोतकरांसह उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाल्या आहेत.

पंकजा मुंडे समन्वयकाच्या भूमिकेत –
जालना मतदार संघातून लढण्यासाठी अर्जुन खोतकर इच्छुक आहेत. भाजप रावसाहेब दानवेंची उमेदवारी टाळू शकत नाही.  भाजपकडून रावसाहेब दानवेंचे नाव जवळपास निश्चित आहे. त्यामुळे शिवसेना खोतकरांना उमेदवारी देऊ शकत नाही. मात्र अर्जुन खोतकर लोकसभा लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे जालना मतदारसंघात तिढा निर्माण झाला आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी आता पंकजा मुंडे यांच्याकडे समन्वयकाची भूमिका देण्यात आली आहे.

दरम्यान आज जालन्याच्या वादावर मातोश्रीवर आज प्राथमिक चर्चा होईल. अंतिम निर्णय मात्र उद्या युतीच्या मेळाव्यापूर्वी घेण्यात येईल. उद्या औरंगाबादमध्ये युतीचा मेळावा आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांच्यासह रावसाहेब दानवे तसेच अर्जुन खोतकर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे जालन्याच्या मतदार संघात कोणता नवा ट्विस्ट येईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.