रोहित तिवारीची पत्नी पोलिसांच्या ताब्यात ; हत्या प्रकरणाला नवे वळण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नारायण दत्त तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर यांचा मृत्यू नैसर्गिक नसून नाक, तोंड आणि गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे शवविच्छेदनात उघडकीस आले आहे. दिल्ली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून पोलिसांनी रोहितची पत्नी अपूर्वा हिच्याकडे चौकशी सुरु केली असून तिला ताब्यात घेतले आहे.

रोहित शेखर हा १६ एप्रिल रोजी संशयास्पदरित्या घरात मृतावस्थेत आढळला होता. यावेळी घरात रोहितची आई उज्ज्वला आणि पत्नी अपूर्वा या दोघीच होत्या. पोलिसांनी रोहितची पत्नी अपूर्वा तिवारी आणि घरात काम करणाऱ्या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात अपूर्वाचाही सहभाग असू शकतो, असा पोलिसांना संशय आहे. शनिवारपासून तिच्याकडे चौकशी सुरु आहे.

रोहितच्या आई उज्ज्वला यांनी याबाबत सांगितले की, रोहित आणि अपूर्वा यांचे नातेसंबंध फारसे चांगले नव्हते. गेल्या वर्षी त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर पहिल्या दिवसापासूनच शेखर आणि अपूर्वामध्ये वादविवाद सुरु होते. रोहित आणि अपूर्वाचे सतत वाद होत असत. त्यामुळे तो तणावाखाली होता. रोहितची हत्या माझ्यासाठी मोठा धक्का असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दिल्ली पोलिस गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करीत आहेत.