Coronavirus : न्यूझीलंडने भारतीय प्रवाशांना केली बंदी ! वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घेतला निर्णय

ऑकलंड : भारतातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन न्यूझीलंड सरकारने भारतीय प्रवाशांना न्यूझीलंडमध्ये येण्यास बंदी घातली आहे. त्यात भारतात आलेल्या न्यूझिलंड नागरिकांवरही ही बंदी लागू केली आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनी आज ही घोषणा केली.

कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षी सुरु झाल्यानंतर न्यूझीलंडने तातडीने प्रभावी उपाय योजना लागू केल्या होत्या. त्यामुळे देशभरात अतिशय अल्प प्रमाणावर कोरोना बाधित आढळून आले होते.

गुरुवारी न्यूझीलंडच्या सीमेवर २३ नवीन पॉझिटिव्ह कोरोना बाधित आढळून आले. त्यातील १७ हे भारतातून आलेले प्रवासी होते. त्यामुळे तातडीने भारतीय प्रवाशांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ही बंदी ११ एप्रिलपासून २८ एप्रिलपर्यंत लागू करण्यात आली आहे.

ऑकलंडमध्ये एका पत्रकार परिषदेत पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनी सांगितले की, आम्ही भारतीय प्रवासीसाठी न्यूझीलंडमध्ये तात्पुरते प्रवेश बंद करत आहोत. न्यूझीलंडमधील ही बंदी ११ एप्रिल रोजी स्थानिक वेळेनुसार दुपारी ४ वाजता सुरु होईल आणि ती २८ एप्रिलपर्यंत सुरु राहील. त्यानंतर रिक्स मॅनेजमेंट जोखीमीचा विचार करुन पुढील निर्णय घेईल.

न्यूझीलंडमध्ये गुरुवारी एका स्थानिक नागरिक कोरोना बाधित आढळून आला. कोरोना बाधितांना विलगीकरण सेवा पुरविणार्‍या ठिकाणी हा काम करीत होता. २४ वर्षाच्या या युवकाचे लसीकरण झाले नव्हते.